Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात पायलटच्या चुकीमुळे? अमेरिकी वृत्तपत्राचे दावे एएआयबीने फेटाळले!

    18-Jul-2025   
Total Views |


नवी दिल्ली : (AAIB slammed The Wall Street Journal Report) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयासमोर सादर केला. या अहवालामध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झालेला संवाद आणि इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अहवालावर अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राने वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कटऑफ मोडवर हलवल्याचा दावा केला होता. या दाव्याला एएआयबीने टीकात्मक प्रत्युत्तर देताना 'हा अहवाल अपूर्ण आणि निवडक माहितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. अंतिम अहवालापूर्वी असे निष्कर्ष काढणे घाईचे असल्याचे' त्यांनी म्हटले आहे.


एएआयबीने निवेदनात काय सांगितलंय?

एएआयबीने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, "एअर इंडिया अपघातातील त्यांचे प्राथमिक अहवाल हा 'काय घडले' याबद्दल माहिती देण्यासाठी होते आणि या दुर्घटनेची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.प्रवाशांच्या कुटुंबातील सदस्यांना, विमानातील कर्मचाऱ्यांना आणि इतर मृत्यूंची संवेदनशील बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. काही आंतरराष्ट्रीय माध्यमे निवडक आणि अपूर्ण वृत्तांकनांद्वारे वारंवार निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. अशा कृती बेजबाबदार आहेत, विशेषतः चौकशी सुरू असताना. आम्ही जनतेला आणि माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी तपास प्रक्रियेच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या अकाली कथित गोष्टी पसरवू नयेत", असे एएआयबीने म्हटले आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मूल्यांकनाचा हवाला देत, अमेरिकी वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले आहे की, एअर इंडियाच्या विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांनी फ्युएल कंट्रोल स्विच बंद केले होते. टेकऑफ केल्यानंतर काही क्षणांतच, क्लाईव्ह कुंदर यांनी सभरवाल यांना विचारले की, "तुम्ही स्विच 'रन' वरून 'कटऑफ' का केले?" असे अहवालात म्हटले आहे. हे लक्षात आल्यानंतर फर्स्ट ऑफिसर कुंदर घाबरले, तर कॅप्टन मात्र शांतच असल्याचे दिसून आले, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात नमूद आहे.





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\