मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी मातोश्रीला खुश ठेवण्यासाठी भास्कर जाधव यांचा हा खटाटोप सुरू आहे, असा हल्लाबोल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे. गुरुवार, १७ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री योगेश कदम म्हणाले की, "विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी मातोश्रीला खुश ठेवण्यासाठी भास्कर जाधव यांचा हा खटाटोप सुरू आहे. एकीकडे सभागृहात मला सगळे नियम माहिती आहे, असे भासवतात आणि दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांचा अवमान करतात. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राने ही त्यांची निष्ठा पाहिली आहे. आदित्य ठाकरेंचा मांजर म्हणून आवाज काढणारे हेच भास्कर जाधव आहेत. त्यामुळे आता त्यांच्या बाजूला बसून त्यांना हे आठवत नाही का? विरोध करणे हा आपला अधिकार आहे. पण तो अधिकार बजावत असताना पातळी सोडून टीका केल्यास आम्ही ते सहन करणार नाही," असे ते म्हणाले.
"हनी ट्रॅप बद्दल विरोधकांकडून एकही पुरावा दिला नाही. त्यांनी पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करू. फक्त वातावरण तयार करून ते खोटी गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला भासवतात. नाना पटोले यांनी फक्त तो पेनड्राईव हात वर करून दाखवला. त्यांनी तो अध्यक्षांकडे दिला नाही किंवा पटलावर ठेवला नाही. अधिवेशनाच्या तीन आठवड्यात विरोधकांना सरकारच्या एकाही निर्णयाला विरोध करता आला नाही. त्यामुळे उरलेले १० टक्के अस्तित्व दाखवण्यासाठी सरकारची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," असेही योगेश कदम म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....