मुंबई, महाराष्ट्र शासनाने बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठासोबत ऊर्जा संशोधन आणि धोरण विकासासाठी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण बी, महापारेषणचे संजीव कुमार आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार मोहित भार्गव उपस्थित होते. आभा शुक्ला आणि मोहित भार्गव यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारामुळे महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि धोरणात्मक सहकार्याला चालना मिळणार आहे. स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारी वीज, ऊर्जा साठवणूक, वीज बाजार रचना, ग्रिड प्रसारणातील सुधारणा, हवामान अनुकूल धोरणे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांवर संयुक्तपणे काम होईल.
“कॅलिफोर्निया विद्यापीठासारख्या संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे ऊर्जा संशोधन आणि नवोन्मेषाला गती मिळेल. हा करार स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल. ऊर्जा साठवणूक, वीज बाजार आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी संयुक्त संशोधन आणि क्षमता वृद्धीला प्रोत्साहन मिळेल,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. हा करार परस्पर विश्वास, समानता आणि सामूहिक हितावर आधारित आहे. यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि प्रशासनाला नवसंशोधन, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीच्या संधी मिळतील. पर्यावरणस्नेही आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने राज्याचा प्रवास गतिमान होईल, असे आभा शुक्ला यांनी नमूद केले.
फायदा काय होणार?
- स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या वीजेचा विकास - ऊर्जा साठवण तंत्रज्ञान संशोधन - वीज बाजार रचना आणि धोरण निर्मिती - ग्रिड प्रसारणातील नवोन्मेष - हवामान अनुकूलता उपाययोजना - कौशल्य विकास आणि प्रशिक्षण
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.