सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी

    17-Jul-2025   
Total Views |

मुंबई : लोकल रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. मात्र, कार्यालयीन वेळेतील गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे प्रवास दिवसागणिक असह्य होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेच्या नियोजनासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. 

“अर्धा तास उशिरा कामाला सुरुवात केल्यास सायंकाळी कामाचे तास वाढतील, पण एकूण कामाचे तास बदलणार नाहीत,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना सरनाईक बोलत होते. प्रवाशांना मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्याय वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

मुंब्रा येथील रेल्वे अपघातासंदर्भात अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बुधवारी चर्चा झाली. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाले. जखमींवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांत तातडीने उपचार करण्यात आले. रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असली, तरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार गंभीर आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. मुंब्रा अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकाऱ्यांसोबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन, प्रवासादरम्यान होणारे मृत्यू टाळणे आणि स्थानकांची सुरक्षा यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार

परिवहन सेवेवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप-वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू आहे. अ‍ॅप-आधारित परिवहन सेवांमधील गैरप्रकारांवरही कारवाई सुरू असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मुंबईतील प्रवास सुकर आणि सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही प्रताप सरनाईक यांनी दिली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.