मुंबई : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम, अर्थ सभापती दिनकर दहिफळे, किनवट बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे तसेच ८ संचालकांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, आ. तुषार राठोड, नांदेड जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजुरकर, नांदेड उत्तर अध्यक्ष संतुकराव हंबर्डे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून, भाजपाच्या विकास आणि राष्ट्रीयत्वाच्या धोरणाला स्विकारून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या मागे आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू. भाजपाची विचारधारा गावागावांत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकदिलाने काम करू असेही त्यांनी नमूद केले.
आज प्रवेश केलेल्या सर्वांच्या साथीमुळे भाजपाला नांदेड आणि संपूर्ण मराठवाड्यात बळ मिळेल असा विश्वास खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये किनवटचे प्रदेश युवक सचिव अजित साबळे, किनवट बाजार समितीचे संचालक श्रीराम कांदे, युवक तालुका अध्यक्ष तसेच किनवट बाजार समितीचे संचालक बालाजी बामणे, सुनील घुगे, प्रल्हाद सातव, प्रेमसिंग साबळे, कैलास बिज्जमवार, विद्या दासरवार, कुसुम मुंडे आदींचा समावेश आहे.