मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत 'उबाठा' गटाच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. “डिनोने तोंड उघडले, तर अनेकांचा ‘मोरया’ होईल,” असा इशाराही त्यांनी दिला. सिमेंट-काँक्रीट रस्त्यांना २५ वर्षे दुरुस्तीची गरज नसते, मग दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली कोणी पैसे काढले? आम्ही रस्ते स्वच्छ केले, पण तुमच्या लोकांनी तिजोऱ्या धुतल्या. मिठी नदीतील गाळ काढण्याचे कंत्राट कोणत्या ठेकेदाराला दिले? तिथे मराठी माणूस दिसला नाही, पण ‘डिनो मोरिया’ दिसला. त्याने तोंड उघडले, तर अनेकांचे बिंग फुटेल, असे ते म्हणाले.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जो स्वतः काचेच्या घरात राहतो, तो दुसऱ्याच्या घरावर दगड मारत नाही. टेंडरच्या नावाखाली मुंबई विकणारे कोण? आत्मपरीक्षण करा, असा सल्ला त्यांनी ठाकरे गटाला दिला. मराठी भाषेला अभिजात दर्जा, विश्व मराठी संमेलन आणि मराठी माणसांसाठीच्या योजनांचा दाखला देत शिंदे यांनी महायुतीच्या कामगिरीचा पुनरुच्चार केला. आमचे काम बोलते, म्हणूनच महायुतीला जनतेने बहुमत दिले, असे ते म्हणाले. कोस्टल रोड, सिमेंट-काँक्रीट रस्ते, झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि मराठी माणसांना परत आणण्याचे प्रयत्न यांचा उल्लेख करत त्यांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर भर दिला. सफाई कर्मचाऱ्यांसाठी योजना आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी हौसिंग स्टॉक वाढवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पत्राचाळ, बॉडी बॅग आणि खिचडी कंत्राटातील गैरव्यवहारांचा उल्लेख करत ठाकरे गटावर टीका केली. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन देत शिंदे म्हणाले, मुंबईला जगाशी जोडण्याचे आणि देशाचे ग्रोथ इंजिन बनवण्याचे काम आम्ही करत आहोत. मुंबईचा कायापालट होत आहे. मोतीलाल नगर, गोरेगाव येथे ४ हजार ९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा अभ्युदयनगर येथे ११ हजार ४११ भाडेकरूंसाठी सप्टेंबर २०२५पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे २,०१० रहिवाशांना क्लस्टर पुनर्विकासाचा लाभ होईल. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात १५ हजार ६०० भाडेकरूंचे पुनर्वसन होणार असून, वरळीतील ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्ट २०२५पर्यंत होईल.
बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार
रमाबाई आंबेडकर नगर येथे ६ हजार १४४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होत आहे. गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासासाठी त्याग केला. त्यांना मुंबईत परत आणण्यासाठी हौसिंग स्टॉक वाढवू. १ लाख ७४ हजार १७२ कामगारांची नोंद झाली असून, १३,१६१ जणांना घरे दिली आहेत. एक लाख घरे उपलब्ध करू, असे शिंदे यांनी सांगितले. धारावी पुनर्विकासामुळे मुंबईचे नाव जागतिक पातळीवर पोहोचेल. ७२ हजार कुटुंबांचे पुनर्वसन होईल. रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सलोख्याचे हे मॉडेल असेल. ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल आहे. नवीन गृहनिर्माण धोरणांतर्गत ७० हजार कोटींची गुंतवणूक करून ३५ लाख परवडणारी घरे बांधू. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ४० लाख झोपडपट्टीवासीयांसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.