मुंबई : राईट टू रिप्लाय अंतर्गत बोलू न दिल्याचा आरोप करत गुरुवार, १७ जुलै रोजी विरोधक विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी हातवारे करत विधानसभा अध्यक्षांचा अवमान केल्याचा ठपका ठेवत मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "विधानसभा सभागृहात नियम २९३ च्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिले. आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावाची सुरुवात केली होती. जेव्हा आपण एखादा प्रस्ताव मांडतो, त्यावर चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर त्यावर जेव्हा उत्तर दिले जाते त्यावेळी ज्या सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला ते उत्तर ऐकण्यासाठी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित असतात, ही आजपर्यंतची प्रथा आहे. आज एकनाथ शिंदे साहेब उत्तर देत असताना आदित्य ठाकरे सभागृहात नव्हते. शिंदे साहेबांनी जवळपास एक तास विस्तृतपणे उत्तर दिले."
"त्यानंतर भास्कर जाधव उठले आणि राईट टू रिप्लाय अंतर्गत मला बोलायचे आहे, अशी विनंती त्यांनी अध्यक्षांना केली. यावर अध्यक्षांनी तुम्हाला राईट टू रिप्लाय देता येणार नाही असे त्यांना सांगितले. नियमाप्रमाणे जे सदस्य चर्चा सुरू करतात त्यांनाच रिप्लाय देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्हाला बोलता येणार नाही हे अध्यक्षांनी त्यांना स्पष्ट सांगितले. याउपर भास्कर जाधव जोरजोराने बोलायला लागले. त्यांनी अध्यक्ष महोदयांवर आक्षेप घेतला. त्यांच्याकडे बघून हातवारे केले. तुम्ही कामकाज रेटू शकत नाहीत. तुमच्यात दम असेल तर मला निलंबित करा असे त्यांनी अध्यक्षांना चॅलेंज देणारे वक्तव्य त्यांनी केले," असे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंकडून हातवारे!
"हे सगळे सुरू असतानाच आदित्य ठाकरे सभागृहात आले आणि त्यांनी आमच्या सगळ्यांकडे बघून हातवारे केले. त्यांनी काही अपशब्द वापरले. त्यानंतर आमच्या बाजूचेही काही सदस्य वेलमध्ये आले आणि आक्रमक झाले. या सगळ्या गोंधळानंतर सभागृह तहकूब झाले. भास्कर जाधव यांचे वर्तन असंसदीय आहे, विधानसभा अध्यक्षांचा अवमान करणारे आहे. हे कुठल्याही नियमात बसणारे नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मी केली. चर्चेदरम्यानचे सगळे व्हिडिओ फुटेज तपासून अध्यक्षांनी भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे या दोघांवरही कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे," असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....