पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांचे घर उद्ध्वस्त करून आपल्या तालिबानी आणि असंस्कृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे.
जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे ढाक्यातील पिढीजात घर उद्ध्वस्त करून बांगलादेशी सरकारने आपल्या तालिबानी प्रवृत्तीचे दर्शन घडविले. भारतातील एकाही विरोधी नेत्याने याबद्दल नापसंती किंवा निषेध व्यक्त केलेला नाही. अपवाद फक्त प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा. त्यांनाही केवळ बंगाली अस्मितेमुळे नाइलाजाने का होईना, या घटनेचा निषेध करावा लागत आहे. पण, जागतिक स्तरावरही या मनोवृत्तीचा निषेध होताना दिसत नाही, हे सर्वस्वी दुर्दैवी!
यापूर्वी अफगाणिस्तानातील कट्टर इस्लामी विचारसरणीच्या तालिबानी राजवटीने बामियान येथे उभे असलेल्या भव्य बुद्धाचा पुतळा तोफा लावून उद्ध्वस्त केला होता. कर्नाटकातील श्रवणबेळगोळमधील महावीराच्या पुतळ्याची आठवण करून देणारे डोंगरातील पाषाणांत कोरलेले हे अनेक फूट उंचीचे पुतळे जागतिक वारशाचा भाग होते. पण, धार्मिक कट्टरतेची पट्टी डोळ्यांवर बांधलेल्या तालिबान्यांना त्यात संस्कृती नाही, तर धर्म दिसला. सार्या जगाने तेव्हा तालिबान्यांची निर्भर्त्सना केली, तरी हताशपणे हा विध्वंस पाहण्याशिवाय जगाच्या हाती काही नव्हते. प्रत्येक मुस्लीम आक्रमकाने आक्रमित केलेल्या देशातील सर्व सांस्कृतिक प्रतीके आणि ठेवा नष्ट करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. जे इस्लामशी संबंधित नाही, त्याचा विनाश इतकीच ही हिंसक मानसिकता. नालंदा विश्वविद्यालयातील लक्षावधी पुस्तके आणि ग्रंथ जाळताना आपण मानवी ज्ञानाचा किती दुर्मीळ आणि प्रचंड साठा जाळून नष्ट करीत आहोत, याची किंचितही कल्पना बख्तियार खिलजीला नव्हती. कारण, त्याचे अज्ञानातील सुख. औरंगजेबाने निव्वळ धार्मिक कट्टरतेपायी हिंदूंची हजारो देवळे उद्ध्वस्त केली. तेव्हा त्याला या देवळांच्या बांधकामातील अजोड कलाकुसर आणि प्रमाणबद्ध सुंदर मूर्ती दिसल्या नाहीत. कारण, हिंदूद्वेषाने त्याच्यातील ज्ञानवापी असो की, अयोध्येतील बाबरी मशीद असो, ती मूळ हिंदूंच्या सुंदर कलाकृती नष्ट करूनच उभ्या राहिल्या होत्या. ज्ञानवापीचे आज उघड दिसणारे अवशेष हे मूळ मंदिर किती कलाकुसरीने बांधले असेल, त्याची स्पष्ट झलक दाखविते.
सत्यजित रे यांचे घर पाडून त्या जागी अशी कोणती राष्ट्रीय महत्त्वाची इमारत उभी करायची होती का? तर तसेही नाही. तेथे लहान मुलांसाठी शिशुविहार उभा राहणार आहे. त्यासाठी नेमक्या या घराचीच जागा आवश्यक होती का? ही सुविधा अन्यत्रही उभी करता आली असती. मुळात या इमारतीकडे बांगलादेशी सरकारने हेतूत: दुर्लक्ष केले होते. म्हणूनच ती इमारत मोडकळीस आली होती. यापूर्वी या राजवटीने रवींद्रनाथ टागोरांचे घर पाडले. आता सत्यजित रे यांचे. यावरून या राजवटीची हिंदूद्वेषी मानसिकता उघड होते. आधी आपल्याच देशाचे नागरिक असलेल्या हिंदूंवर अत्याचार करून आणि त्यांची कत्तल करून या बांगलादेशी शासकांचे मन भरले नाही. त्यामुळे आता मूल हिंदूंच्या वास्तूंवर त्यांची वक्रदृष्टी वळली आहे. बांगलादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या ‘नोबेल’ पुरस्काराचे पितळही या घटनेने उघडे पडले आहे. ‘नोबेल’ हा जागतिक स्तरावरील सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार. पण, आपण या सन्मानासाठी लायक नाही, हेच युनूस यांनी सिद्ध केले. कारण, युनूस हे काही राजकीय किंवा क्रांतिकारक विचारसरणीचे नेते नव्हे. ते बुद्धिवादी वर्गात मोडतात. त्यामुळे ते संकुचित जातीयवादी विचारांनी भारावलेले नसावेत, असे अपेक्षित होते. निदान त्यांना तरी सत्यजित रे यांच्या जागतिक कीर्तीची जाणीव असायला हवी होती. तशी ती असती, तर त्यांनी या घराची जपणूक करायला हवी होती. पण, एका सामान्य सुविधेसाठी एका ऐतिहासिक वास्तूचा बळी देण्यात आला. सत्यजित रे यांच्यासारखे महान दिग्दर्शक हे मूळ बांगलादेशी होते, हे कौतुक मिरविण्याचे भाग्य या कपाळकरंट्या बांगलादेशी सरकारच्या नशिबी नव्हते.
भारतीय चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या घराण्याची पिढीजात हवेली पेशावरमध्ये होती. आता काळाच्या आघाताने ती पाडण्यात आली. पण, भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्ताननेही ही हवेली अनेक वर्षे सुरक्षितपणे सांभाळली होती. भारतानेही पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा मुंबईतील मलबार हिलवरील ‘जिन्ना हाऊस’ हा बंगला अतिशय काटेकोर स्वरूपात जपला होता. इतकेच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी त्याचे पूर्वीचे वैभव जपत त्याचा कायापालटही करण्यात आला होता.
प्राचीन मानवी संस्कृतीची प्रतीके ही कोणा एका धर्माच्या किंवा देशाच्या मालकीची नसतात, तर ती सार्या जगाचा सांस्कृतिक ठेवा असतात. शाहजहान या मुघल बादशहाबद्दल हिंदूंच्या अनेक तक्रारी आहेत. पण, म्हणून हिंदूंनी त्याने बांधलेला ताजमहाल उद्ध्वस्त केला नाही. मात्र, मुस्लीम शासकांना धर्मापुढे दुसरे काहीही दिसत नाही. भारतातील मंदिरांतील असंख्य अजोड शिल्पे ही आज तुटक्या स्थितीत दिसतात. कारण, मुस्लीम शासकांनी केवळ पुतळ्यांच्या विरोधासाठी (ज्याला ते बुत परस्ती म्हणतात) या सुंदर कलाकृती निर्दयतेने नष्ट केल्या आहेत. या मंदिरांकडे आणि त्यातील शिल्पांकडे धार्मिक दृष्टीने न पाहता केवळ एक कलाकृती म्हणून पाहण्याची बुद्धी एकाही मुस्लीम शासकाकडे नव्हती. त्यामुळे ‘इस्लामिक स्थापत्य’ हा शब्द वापरणार्यांच्या बुद्धिमत्तेची दिवाळखोरी उघड होते.
एकीकडे आजही रामलीला सादर करणारा, गणपतीचे चित्र आपल्या चलनी नोटेवर छापणारा जगातील सर्वांत मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया आहे. आज आम्ही इस्लामी उपासना पद्धत स्वीकारली असली, तरी राम हा आमचा पूर्वज आहे, हे इंडोनेशिया ठणकावून सांगतो. दुसरीकडे ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या कट्टर संघटनेला जन्म देणार्या मुस्लीमबहुल इजिप्तनेही पिरॅमिड आणि अन्य प्राचीन पुतळे व वास्तू सुरक्षितपणे जपल्या आहेत. चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या डोळ्यांमध्ये तिबेटी धर्म खुपत असला, तरी त्या राजवटीने तिबेटमधील असंख्य मॉनेस्ट्री आणि वास्तू नीट शाबूत राखल्या आहेत. पण, समृद्ध प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा लाभलेल्या बांगलादेशाने आपल्या या सांस्कृतिक मुळांवर आघात करून आपल्या करंटेपणाचे दर्शन घडविले आहे. भारताच्या संपन्न कलेच्या धबधब्यातही हा देश कोरडा पाषाणच राहिला!