मुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना थेट ऑफर

    16-Jul-2025   
Total Views |

मुंबई, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने बुधवारी त्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधले. “उद्धवजी, २०२९ पर्यंत तरी आमचा विरोधी पक्षात येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल,” असे फडणवीस म्हणाले, ज्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षनेता म्हणून दानवे यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. लोकशाहीत विरोधी पक्षनेतेपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी स्वतः हे पद भूषवले आहे आणि माझा जास्त काळ विरोधी पक्षात गेला आहे. दानवे यांनी आक्रमकता आणि गौप्यस्फोटांद्वारे या पदाला न्याय दिला. त्यांनी पुन्हा सभागृहात यावे, अशा शुभेच्छा आहेत. मात्र, याच पदावर यावे, असे नाही. उद्धवजी म्हणतील, आम्ही पळवापळवी करतो, पण त्यांच्यासाठी सत्ताधारी पक्षात येण्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल.”

फडणवीस पुढे म्हणाले, “दानवे यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी आहे आणि ते हा विचार सोडणार नाहीत. ते नेहमी याच दिशेने काम करत राहतील.” पुढील विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विरोधक आणि सभापती मिळून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहाव्या वर्षापासून संघाच्या शाखेत जायचो - अंबादास दानवे

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, मी मागील ३० वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करीत आहे. त्या काळात चंद्रकांत पाटील विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्यावेळी काश्मीरचे आंदोलन सुरू होते, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेगळी जबाबदारी होती. देशामध्ये वेगळ्या प्रकारचे वातावरण असताना आमच्यासारखे युवक पकडले जात होते. काश्मीरमध्ये तिरंगा फडकावयला मुरली मनोहर जोशी श्रीनगरला गेले होते. त्यांच्यासोबत मी सुद्धा होतो, याचा मला अभिमान आहे. तसेच मी दहाव्या वर्षांपासून संघाच्या शाखेत जायचो, अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.