मुंबई, मालेगावमधील अवैध पशूवधखान्यांवर लवकरच हातोडा पडणार आहे. भाजप आ. विक्रांत पाटील यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर मंत्री उदय सामंतांनी मंगळवार, दि. २१ जुलै रोजी विधान परिषदेत कारवाईची घोषणा केली.
मालेगाव महानगरपालिकेतील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागात रक्तमिश्रित सांडपाणी वाहत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. असे रक्तमिश्रित पाणी मोसम नदी आणि गोदावरी नदीमध्ये सोडले जाते. अशा अनाधिकृत पशूवधखान्यांवर सरकार कारवाई करणार का? असा सवाल आ. विक्रांत पाटील यांनी उपस्थित केला. या चर्चेत भाजपचे गटनेते आ. प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
अनाधिकृत पशूवधखान्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची अपेक्षा असते. परंतु आजच्या या लक्षवेधीनुसार अनाधिकृत पशूवधखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना यापूर्वीच दिलेले आहेत. ते नियमानुसार करत नसतील तर, पशूवधखांन्यावर कारवाई करण्याचे आदेश सभागृहातून दिले जातील, असे स्पष्ट मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडले. तसेच मालेगाव येथील सर्व कत्तलखाना मंडळींची देखील चर्चा झाली आहे. यात जो महापालिकेचा कत्तलखाना आहे, त्याच ठिकाणी भविष्यातील सर्व पशूवध केले जावेत, सण, उत्सवाप्रसंगी याच ठिकाणी कराव्यात, या पद्धतीचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पशूवधखाने हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. संपूर्ण पशूवधखान्याची चौकशी करणे योग्य होणार नाही. जे अधिकृत व्यवस्थितरित्या नियमांचे पालन करत असतील तर ते देखील याच्यामध्ये भरडले जातील. कोणीही पशूवधखान्यांचे समर्थन करत नाही. अनाधिकृत पशूवधखाने नसावेत हीच शासनाची भूमिका आहे. मालेगाव महानगरपालिकेने याविषयी ठोस निर्णय घेतला आहे की, पशूवधखान्यामधील जो काही प्रकार आहे, तो बाहेर येऊ नये, यासाठी त्याची व्यवस्थाही त्याच ठिकाणी नियमानुसार करावी, अशा प्रकारच्या सूचनाही केल्या आहेत. तसेच खालच्या सभागृहात गृह विभागाला याविषयी काय आदेश दिले आहेत ते तपासून त्यानुसार आदेश दिले जातील, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
अधिकार्यांकडून वेळकाढूपणा
मोसम नदी, गिरना नदीच्या संगमामध्ये आणि गोदावरी नदीपात्रांमध्ये हे रक्त मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हिंदूच्या भावना भडकल्या आहेत, असे आ. विक्रांत पाटील म्हणाले. त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, नदीमध्ये कोठेही रक्तमिश्रित पाणी सोडले जात नाही, असे उत्तर अधिकार्यांनी का दिले आहे, याची देखील चौकशी करण्यात येईल. सभागृहामध्ये अशा प्रकारचे उत्तर देऊन जर अधिकारी वेळाकाढूपणा करत असतील, तर ते योग्य नाही. ही पद्धत चुकीची आहे, असे सामंत म्हणाले. आता आमदारांना एवढेच काम राहिले : प्रसाद लाड
मंत्र्यांनी आम्हाला उत्तर दिले की, त्या संबंधीचे पुरावे द्या कारवाई करू, चौकशी करू. आता आमदारांना एवढेच काम राहिले आहे की, अन्वेषण करून ते तुमच्या पटलावर आणून ठेवा? एखादा सदस्य प्रश्न मांडतो आहे. ते सत्य आहे समजून तुम्ही कारवाई केली पाहिजे. तुमच्याकडे पोलीस आहेत. त्यांच्याकडून चौकशी करा. कारवाई करा. येणारा कुंभमेळा हिंदूंसाठी पवित्र आहे. तुम्ही पोलिसांना स्पष्टपणे आदेश द्या की, जेवढे अनाधिकृत पशूवधखाने आहेत ते बंद करा, राज्यात किती आहेत, आणि ते बंद करणार का?, असा सवाल आ. प्रसाद लाड यांनी उपस्थित केला.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.