पुणे : (Vaishnavi Hagawane Case) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अकरा आरोपींविरुद्ध १६७० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात वैष्णवीाचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोपावरुन आरोपींविरोधात बावधन येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अकरा आरोपींविरुद्ध १६७० पानांचे दोषारोपपत्र सोमवार, दि. १४ जुलै रोजी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. यामध्ये आरोपींविरोधात भक्कम पुरावे संकलित केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे, वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून नातेवाईकांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण आणि आत्महत्येच्या घटनेनंतर पसार झालेल्या राजेंद्र आणि सुशील हगवणेला आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील, मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव व राहुल दशरथ जाधव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग ठोस पुराव्यांआधारे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी न्यायालयात दिली. आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी आरोपी प्रीतम पाटील, मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव, तसेच राहुल दशरथ जाधव यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\