तुकडेबंदी कायद्याची अधिसूचना लवकरच : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    15-Jul-2025   
Total Views |


मुंबई : पावसाळी अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी आम्ही तुकडेबंदी कायद्याची अधिसूचना काढणार असून १५ दिवसांत एक एसओपी सुद्धा काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.


मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आमच्या सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळी अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी आम्ही त्याबद्दलची अधिसूचना काढणार असून १५ दिवसांत एक एसओपी सुद्धा काढणार आहोत. त्या माध्यमातून तुकडेबंदी कायदा रद्द करून सर्व लोकांची घरे कायदेशीर करण्याचे काम सरकार करणार आहे."


"एक राज्य एक नोंदणीच्या माध्यमांतून एका जिल्ह्यात कुठलीही नोंदणी कोणत्याही कार्यालयातून करता येते. आम्ही अशी पद्धत आणतो आहोत ज्याद्वारे मुंबईचा व्यक्ती पुण्यातून, पुण्याचा व्यक्ती नागपुरमधून आधारकार्डच्या माध्यमातून नोंदणी करू शकणार आहे. यामुळे नोंदणी कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजातील नोंदणीसंदर्भात असलेला नाराजीचा सूर दूर होणार आहे. ज्यांना वाटते की, यात त्रुटी होऊ शकतात, त्या सगळ्या त्रुटी आम्ही दूर करू," अशीही माहिती त्यांनी दिली.


प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन नाहीच


"प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन कुणीच करू शकत नाही. एखाद्या आरोपीलावाचवण्यासाठी आम्ही धडपड करू ही आमची वृत्ती नाही. आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी तो आरोपीच आहे. संभाजीब्रिगेडबद्दल आमचे काही वेगळे मत असेल तर आम्ही आमच्या बैठकीत ते व्यक्तिगत मांडू. पण अशा प्रकारे भ्याड हल्ला करणे योग्य नाही. त्यामुळे या घटनेचे समर्थन नाहीयावर पोलिसांनी पूर्ण कारवाई केली असून त्यांना याप्रकरणात सगळी कारवाई  करण्याचा अधिकार आहे. मी कधीही कोणत्याही पोलिसाला कुठलाही फोन केला नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....