
मुंबई : संजय दत्त याने ज्या कारमधून एके-४७ बंदूक घेतली होती त्याबद्दल आधीच पोलिसांना सांगितले असते तर, १९९३ चा बॉम्बस्फोट झालाच नसता, असा खुलासा विशेष सरकारी वकील आणि राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
उज्ज्वल निकम म्हणाले की, "१२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या काही दिवसांपूर्वी अबूसालेम संजय दत्तच्या बंगल्यावर एक शस्त्रांनी भरलेली टेम्पोव्हॅन घेऊन गेला. त्यामध्ये हँडग्रेनेड आणि एके-४७ होती. त्यातील काही संजयने त्यातून काढून घेतल्या आणि नंतर त्या परत केल्या. पण एक एके-४७ स्वत:कडे ठेवून घेतली. ही घटना संजय दत्तने आधीच पोलिसांना सांगितली असती तर १२ मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला नसता. ही त्याची मोठी चूक होती. संजय दत्त निष्पाप होता. पण त्याला शस्त्रांचे आकर्षण असल्याने पिस्तूल ठेवले होते," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "न्यायालयाने संजय दत्तला शिक्षा सुनावली होती. त्यामुळे तो घाबरला होता. त्याचे हावभाव बदलले होते. त्याला धक्का बसला होता. तो निकाल सहन करू शकला नाही. तो विटनेसबॉक्समध्ये असताना मी त्याला सांगितले की, ‘संजय असे करू नको. मीडिया तुला पाहत आहे. जर तू घाबरलेला दिसला तर लोक तुलासुद्धा दोषी मानतील. तुला अपील करण्याची संधी आहे, असे मी त्याला सांगितले. त्यानंतर तो शांत झाला."