
मुंबई : राज्यात सर्वत्र ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राजकीय व्यासपीठावर किंवा एखाद्या विषयावर एकत्र येणे वेगळी गोष्ट आहे. पारिवारिक कार्यक्रमातून कौंटुबिक एकत्रितपणा दिसतो. परंतू, राजकीय व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ वेगळे झाले होते. त्यांनी एकत्र यावे, एकत्र रहावे हा त्यांचा पारिवारिक प्रश्न आहे. मला त्यावर काही बोलायचे नाही. दोन भावांनी एकत्र आले तर काय बिघडते? हीच आपली संस्कार आणि संस्कृती आहे. पण ही संस्कार संस्कृती राजकीय नसावी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. यामध्ये त्यांनी दोघांनी एकत्र येऊन काम केले तरी आम्हाला अडचण नाही आणि त्यांचे वेगळे विचार असले तरीही आम्हाला अडचण नाही. कितीही लोकं एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५१ टक्के मते घेऊन भाजप आणि महायुती जिंकेल, हा आमचा मानस असून तशी तयारी आम्ही सुरू केली आहे," असे त्यांनी सांगितले.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच!
"आज सायंकाळी महायुतीची बैठक होणार असून त्यात आम्ही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा करू. या निर्णयाला खूप दिवस झाले आहेत. जितके दिवस हा निर्णय प्रलंबित राहील तेवढे दिवस रायगड आणि नाशिकच्या विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय होण्यासाठी आम्ही चर्चा करू," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.