ओटावा : (Eggs Thrown At ISKCON Rath Yatra In Toronto Canada) कॅनडाच्या टोरंटोमध्ये काढलेल्या इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून केंद्र सरकारने त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रथयात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्या महिलेने केलेल्या पोस्टनंतर हा प्रकार उघडकीस झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध व्यक्त करत कॅनडा सरकारकडे आपली परखड भूमिका मांडली आहे.
सध्या ओडिसामध्ये सुप्रसिद्ध जगन्नाथ पुरी यात्रा चालू आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या टोरंटोमध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही सोमवारी एकत्र येऊन एक रथयात्रा काढली होती. पण या रथयात्रेवर काही लोकांनी अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका महिलेनं यावेळी चित्रित केलेल्या व्हिडीओमधून घडलेला प्रकार सांगितला आहे. "आम्ही इथे रथयात्रा काढत असताना बाजूच्या इमारतीवरून काही अंडी आमच्या दिशेने फेकण्यात आली. आणि दुसरीकडे कॅनडा सरकार म्हणत आहे की त्यांच्याकडे वंशभेद होत नाही", असं या व्हिडिओमध्ये महिला म्हणताना दिसत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे केली कारवाईची मागणी
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कॅनडा सरकारकडे आपली नाराजी व्यक्त केली असून हे कृत्य करणा-यांना त्वरित शासन करावे, अशी मागणी केली आहे. "टोरंटोमधील रथयात्रेदरम्यान काही लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. एकता, सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या अशा एका उत्सवाच्या मूळ तत्वाविरोधात हे असे आक्षेपार्ह आणि अस्वीकारार्ह वर्तन करण्यात आलं आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी स्पष्ट मागणी आम्ही कॅनडा सरकारकडे केली आहे. लोकांच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी कॅनडा सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी आम्हाला आशा आहे", असे रणधीर जयस्वाल यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\