रेडिओ क्लब जेट्टीचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या; मंत्री नितेश राणेंची माहिती

    15-Jul-2025   
Total Views |


मुंबई : गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या रेडिओ क्लब जेट्टीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, १५ जुलै रोजी याबद्दलची माहिती दिली.


विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "मुंबईकरांसाठी एक गोड बातमी आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बंदरे खाते आणि महाराष्ट्र सागरी बोर्डाकडून बांधण्यात येत असलेल्या जेट्टीचे काम सुरू झाले आहे. त्यासंदर्भात काही याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. यावर उच्च न्यायालयाने आजच निर्णय दिला असून सगळ्या याचिका फेटाळल्या आहेत. न्यायालयाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत त्यांनी दिलेले निर्देश नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने काम पूर्ण करणार आहोत," असे त्यांनी सांगितले.


मुंबईकरांचे आयुष्य सुकर होणार!


"गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि भविष्याच्या दृष्टीने समुद्राच्या प्रवासासाठी ही रेडिओ क्लब जेट्टी अतिशय महत्त्वाची होती. आम्ही सातत्याने तिथल्या रहिवाशांसोबत संवाद साधत होतो. सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतरच आम्ही या कामाचे भूमिपूजन करून काम सुरू केले. यामुळे मुंबईकरांचे आयुष्य सुकर होईल. समुद्राच्या प्रवासासाठी रेडिओ क्लब जेट्टी महत्त्वाची होती. नवी मुंबई विमानतळ ते रेडिओ क्लब जेट्टी फक्त ४० मिनिटात पोहोचू शकू असा मार्ग तयार करण्याचा आमचा मानस आहे. याठिकाणी २० बोटी पार्किंगची सुविधा असून १५० गाड्या उभ्या राहू शकतात," असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....