चाकण पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना - विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    14-Jul-2025   
Total Views |

मुंबई, चाकण नगरपरिषदे अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना वापरण्यात आल्या. याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे.

याबाबत आ. भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, चाकण नगरपरिषदेंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाच्या जिल्हास्तर योजनेतर्गत पाणीपुरवठा कामास दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता व दि. १३ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आले. मुदतवाढ दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली असली तरी ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने विलंबदंड वसूल करण्याची तजवीज नगरपरिषद चाकण यांनी ठेवली आहे. मात्र, याच ठिकाणी राज्यस्तर योजनेअंतर्गतही आदेश दिले गेल्याचे निदर्शनास येताच दि. १३ मे २०२५ रोजी संबंधितांना काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, राज्यस्तर योजनेतून कोणतेही देयक अदा करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.