
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल सोमवार, १४ जुलै रोजी विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला सत्ताधाऱ्यांनी अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मंत्री आणि सत्ताधारी आमदार उपस्थित होते. त्याची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. यानिमित्ताने सत्ताधारी आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जल्लोष साजरा केला. यावेळी ‘हा क्षण आनंदाचा हा क्षण अभिमानाचा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
विरोधी पक्षांची अनुपस्थिती!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना विरोधी पक्षातील एकही आमदार दिसले नाही. यावरून आमदार राम कदम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. हेच का विरोधकांचे छत्रपती शिवरायांवरचे प्रेम? असा सवाल त्यांनी केला आहे.