
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून, यासाठी केंद्र सरकारने आधीच नियोजन केले आहे. यासोबतच, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याचा प्रस्तावही केंद्राकडे प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळणे, ही महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यामुळे सात प्रस्तावांपैकी शिवरायांच्या किल्ल्यांचा प्रस्ताव मंजूर झाला. युनेस्कोच्या पॅरिस येथील मुख्यालयात सादरीकरण झाले, ज्यात २० देशांनी एकमताने याला मान्यता दिली,” असे फडणवीस यांनी नमूद केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यावेळी आभार मानले.
उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव देण्याची मागणी विधानसभेत केली. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अतिभव्य स्थानकाचे काम सुरू आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल. तसेच, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रलला देण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना पाठवला आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे अंतिम निर्णयासाठी आहे.”
फडणवीस यांनी शिवरायांच्या किल्ल्यांचा ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “इतरांनी किल्ले महसूल गोळा करण्यासाठी वापरले, पण शिवरायांनी स्वराज्यासाठी त्यांचा उपयोग केला. युनेस्कोच्या यादीत समावेशामुळे या किल्ल्यांचे जागतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.” त्यांनी पंतप्रधान मोदी, महाराष्ट्रातील जनता आणि या कार्यात सहभागी सर्वांचे अभिनंदन केले.
The redevelopment of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) railway station is underway, and it is already in the plan to install an iconic statue of Chhatrapati Shivaji Maharaj there.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 14, 2025
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास सध्या सुरू असून, त्या… pic.twitter.com/UL16XewuBR