
नागपूर : प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे, असा दावा उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अशा प्रकारचे खालच्या पातळीवरचे कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही. परंतू, दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेली शाईफेक ही चुकीची आहे. त्यांचे कृत्य चुकीचे असून पोलिसांनी त्यावर कारवाई केली पाहिजे. दीपक काटे याच्याशी आमचा काही संबंध नसतो. तो भाजपचा कार्यकर्ता आहे. बुके द्यायला आल्यामुळे फोटो काढला."
"प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल झालेल्या घटनेनंतर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेचा आणि भाजपचा कुठलाही संबंध नाही. आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी तो आरोपी असतो. दीपक काटेने प्रवीण गायकवाड यांच्यासोबत असे वर्तन करायला नको होते. हे भाजपला मान्य नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.