घरातील हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, शिक्षणाची कास धरून साहाय्यक राज्यकर आयुक्तपदापर्यंत उत्तुंग झेप घेणार्या ज्ञानेश्वर धात्रक यांच्याविषयी... ज्ञानेश्वर यांचा जन्म दि. ३१ जानेवारी १९६८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथे झाला. जाखोरी या छोट्याशा खेड्यात विठोबा आणि भागुबाई धात्रक हे गरीब शेतकरी कुटुंब राहत होते. घरची केवळ एक गुंठा शेती असल्याने, घरची परिस्थिती तशी हलाखीचीच. त्यामुळे विठोबा यांनी पोट भरण्यासाठी आपले मूळ गाव सोडून, आपली सासूरवाडी असलेल्या मखमलाबादची पत्नीसह वाट धरली. तेथे ते भाड्याने घर घेऊन राहू लागले. मिळेल त्यांच्या शेतात दोघेही शेतमजूर म्हणून काम करू लागले. विठोबा, भागूबाई यांना पार्वती, शिवाजी, सदाशिव, निवृत्ती आणि ज्ञानेश्वर अशी पाच अपत्ये झाली. ज्ञानेश्वर हे शेंडेफळ असले, तरी घरच्या परिस्थितीमुळे लाड आणि कौतुक अशा गोष्टी लांबच होत्या. दिवसभर कमवायचे तेव्हा रात्री खायला मिळणार, अशी स्थिती होती. पण, ज्ञानेश्वर हे लहानपणापासून हुशार तर होतेच, त्याचबरोबर त्यांना शिक्षणाचीही आवडही होती. इतर मुले शाळेत जात आहेत, हे पाहून ज्ञानेश्वर यांनीही शाळेत जाण्याचा हट्ट धरला. शिक्षणाचे महत्त्व ओळखणार्या भागुबाईने नवर्याच्या मागे लागून, आपल्या शेंडेफळाचा तर हट्ट पुरवलाच पण, आपल्या इतर मुलांनाही शिक्षण घेणे भाग पाडले. त्या सर्वांनी जेमतेम शिक्षण घेतले. पण, ज्ञानेश्वर याने शिक्षणासाठी पडेल ती कामे करून, आपले शिक्षण सुरूच ठेवले.
ज्ञानेश्वर यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण, मखमलाबाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मखमलाबाद येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम कॉलेज, नाशिक येथे वाणिज्य शाखेत पदवी घेऊन पूर्ण केले. त्यांनी शिक्षण घेत असतानाच मोठे सरकारी अधिकारी व्हायचे, असे मनाशी पक्के ठरविले होते. त्या दिशेनेही त्यांचा प्रवास सुरू होता. शिक्षण घेत असतानाच १९८५ साली गावातील सार्वजनिक वाचनालयात, दरमहा १०० रुपये पगाराची नोकरी सुरू केली. या नोकरीमुळे त्यांचा दुहेरी हेतू साध्य झाला. एक म्हणजे दरमहा १०० रुपयाने शिक्षणाचा थोडाफार खर्च भागत असे आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे,. त्यांची वाचनाची आवड पूर्ण होत होती. अभ्यासासाठी शांत जागा आणि वेळही मिळत होता. ज्याचा पुरेपूर उपयोग त्यांनी करून घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी मोठ्या भावाने विकत घेतलेल्या जुन्या टेम्पोवर प्रथम लीनर, नंतर ड्रायव्हर म्हणूनही काम केले. त्याचवेळी ते ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा‘च्या परीक्षेची तयारी करीत होते. १९८९ साली त्यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी आणि मंत्रालयीन अधिकारी अशा तीनपदासाठी निवड झाली. त्यापैकी त्यांनी ‘विक्रीकर अधिकारी’ म्हणून १९९५ साली पदभार स्वीकारला. सध्या ते साहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून, कल्याण येथे कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र राजपत्रित विक्रीकर अधिकारी’ या संघटनेची अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढविली आणि बहुमताने ते निवडूनही आले. ‘अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती’ या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणूनही, त्यांनी पद भूषविले आहे.
घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने शैक्षणिक जीवनात संघर्ष आला असला, तरी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने त्यांनी समाजसेवेचे व्रतही अंगीकारले. ज्ञानेश्वर यांनी मुरबाड येथील देवराळवाडी, सुकराळवाडी हे आदिवासी पाडे दत्तक घेऊन, ७५१ वृक्षांचे रोपण केले आहे. केवळ वृक्षरोपण न करता, त्यांचे संवर्धन करण्याचे कामही त्यांनी केले. तेथील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद शाळाही डिजिटल केली. शाळेत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, याकरिता त्यांनी बोअरवेलची सुविधा करून दिली. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता त्यांनी मुलांना वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेशाचे वाटपही केले. सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग तसेच, वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदतही त्यांनी केली आहे. एवढेच नाही, तर वैद्यकीय उपचारासाठीही त्यांनी अनेकांना आर्थिक मदतीचाही हात दिला. मखमलाबाद येथील ज्या वाचनालयातून त्यांनी नोकरी करताना वाचनास सुरुवात केली, त्या वाचनालयामुळेच त्यांना भरपूर वाचन करण्याची संधी मिळाली. यामुळेच राज्यकर साहाय्यक आयुक्तपदापर्यंत पोहोचू शकलो असे मानणार्या ज्ञानेश्वर यांनी, वाचनालयाच्या नूतनीकरणाकरिता भरीव आर्थिक मदतही केली. तसेच, मोठ्या प्रमाणात पुस्तकेही भेट दिली. मूळगाव जाखोरी येथील ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही त्यांनी आर्थिक साहाय्य केले. विक्रीकर अधिकारी म्हणून नोकरी करत असताना, कायद्याच्या चौकटीत राहून शय तेवढी नागरिकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय मखमलाबाद यांच्यावतीने डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. ‘कल्याण सिटीजन फोरम’ तर्फे ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्तेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘खांदेश रत्न पुरस्कार’ देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशाप्रकारे सामाजिक भान ठेवणार्या कार्यकत्याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!