सागर नगरी

    13-Jul-2025   
Total Views |

एकेकाळी रोमन साम्राज्याची संस्कृती वैभवाच्या शिखरावर होती. रणांगणावर लढणार्या योद्ध्यांपासून ते समाजाविषयी चिंतन करणार्या तत्त्वज्ञांपर्यंत, अनेकांमुळे युरोपातील भूमी पावन झाली. इतिहासाचे चक्र फिरले आणि रोमन साम्राज्यालासुद्धा उतरती कळा लागली. आक्रमणकर्त्यांची हिंसक प्रवृत्ती, आर्थिक अडचणी, समाजमनाची खालावलेली नैतिकता या सगळ्यांमुळे रोमन साम्रज्याचा सूर्यास्त झाला. कमीअधिक प्रमाणात जगाचा इतिहास या असाच आहे. एकेकाळी जिथे सुवर्णयुग अवतरलेले असते, तिथे वैभवशाली साम्राज्यांचे साधे अवशेषसुद्धा शिल्लक राहत नाही. मग इतिहासाचा अभ्यास नेमका कशासाठी करावा? या इतिहासातून धडे घेण्यासाठी की, समाज म्हणून आत्मभान जागवण्यासाठी? अभ्यासाचे कारण कुठलेही असले, तरी इतिहास आपल्याला आपल्या वर्तमानाची अधिक सजगपणे जाणीव करून देतो हे नक्की! इतिहास हा जितका माणसांचा असतो, तितकाच तो माणसे जिथे वास्तव्य करतात, त्या नगरांचासुद्धा असतो. समजा, विस्मृतित गेलेले असेच एखादे शहर, आजच्या काळात पुन्हा एकदा आपल्या समोर अवतरले तर? हा विषय कुठल्याही कवि कल्पनेचा नसून, इटलीमध्ये लोकांना ही गोष्ट चक्क अनुभवायला मिळाली.

इटलीच्या इस्चिया बेटावर एनारिया नावाचं एक शहर होतं. इतिहासकारांच्या मते, इसवी सन १८०च्या सुमारास ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे एनारिया नगरी पाण्याखाली गेली. पुढची अनेक शतके सागराच्या तळाशी हे शहर गुडूप झाले होते. रोमन साम्राज्याच्या इतिहासाच्या दस्ताऐवजीकरणाचा विचार केल्यास, त्यामध्येही तत्कालीन इतिहासाचा धांडोळा घेणार्या अभ्यासकांना या विषयाची माहिती नव्हती. यामुळे पुन्हा एकदा या शहराचे होणारे उत्खनन यास एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. ख्रिस्तपूर्व ७५०च्या जवळपास ग्रीकांनी इस्चिया या बेटाचा ताबा घेतला. यानंतर किमान पुढची ४०० शतके तरी ग्रीकांचे या बेटावर राज्य होते. सम्राट वेस्पाशियनचा मित्र आणि रोमन साम्राज्याचा नौदल अधिकारी अशी ज्याची ओळख होती, अशा प्लिनी द एल्डरच्या लिखाणामध्ये आपल्याला एनारिया शहराचा उल्लेख आढळतो. या व्यतिरिक्त ग्रीक इतिहासकार आणि भौगोलिक स्ट्राबो याच्या साहित्यामध्येही आपल्याला या शहाराबद्दल माहिती मिळते. यानंतर पुढचा बराच काळ पाण्याखाली गेल्यामुळे, एनारिया शहर अज्ञातवासात गेले ते कायमचेच.

एनारिया शहर पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्यासाठी १९७० सालचे दशक उजाडले. याकाळात इस्चियाच्या बेटावर काही मातीची भांडी सापडली, ज्यामुळे पुरातत्त्व खात्याने या भूभागात शोध घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर इस्चियाच्या बेटावर पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉन पिएट्रो मोंटी आणि ज्योर्जियो बुकनर यांनी उत्खननाला सुरुवात केली परंतु, त्यांच्या हाती काही लागले नाही. २०११ सालापर्यंत पुन्हा एकदा अज्ञातवासाचा काळ एनारिया शहराच्या नशिबी आला. अखेर २०११ साली, काही स्थानिक खलाशी इतिहास अभ्यासकांच्या संयोगाने समुद्राच्या तळाशी असलेल्या एका घाटाचा शोध लागला. यामुळे पुढे उत्खननाचा मार्ग मोकळा झाला खरा परंतु, हे उत्खनन सोपे नव्हते. समुद्राच्या तळाशी असलेल्या एका नगरीचा शोध यामध्ये घ्यायचा होता. पुढच्या काही वर्षांमध्ये नाणी, संगमरवरी दगडावरच्या कलाकृती, एका विशिष्ट आकाराची मडकी यांचाही शोध लागला. एका लाकडी रोमन जहाजाचा शोध लागल्यानंतर, या शोधयात्रेने कळस गाठला.

आताही पाण्याखाली उत्खनन सुरूच आहे. दिवसेंदिवस एनारिया शहराबद्दलचे लोकांचे कुतूहल वाढते आहे. इतिहासाच्या पानांमध्येसुद्धा या नगरीचा त्रोटक उल्लेख आढळतो. जलसमाधी मिळालेल्या आणि उत्खननामुळे पुन्हा वर तरंगण्याची शक्यता असलेल्या शहराला इतिहासप्रेमी, अभ्यासक भेट देत आहेत. गमतीचा भाग म्हणजे एनारिया शहराच्या इथे सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व ओळखून यामध्ये काहींनी पर्यटनाची संधीसुद्धा शोधली. पाण्याखाली असलेले हे शहर बघण्यासाठी छोट्या छोट्या बोटी, पाणबुडी, स्कूबा डायव्हिंग सुट्स, या माध्यमातून आता व्यापाराचा विचारसुद्धा तिथल्या स्थानिकांनी केला आहे.

इतिहास म्हटले की वादविवाद, स्मारके, ऐतिहासिक ललित साहित्य अशा ठरावीक चौकटींमध्ये आपण अडकून जातो. परंतु, इतिहासाचा शोध घेणारी मुलखावेगळी माणसं, या सगळ्यापलीकडे नवनवीन दालने, समाजासाठी उभी करून देत आहे. त्यामुळे गरज आहे ती शोधक नजरेची आणि अविरत ध्यास घेत, काम करणार्या खर्याखुर्या इतिहासप्रेमींची!

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.