कलाविश्वाचा झगमगाट म्हणजे यश, प्रसिद्धी आणि ‘ग्लॅमर’ असे एक समीकरण. पण, या झगमगाटामागे कित्येक कलाकारांचे मन झुंजत असते अपेक्षांच्या ओझ्याशी, इंडस्ट्रीमधील अस्थिरतेशी आणि अगदी खाऊन उठणार्या एकटेपणाशीही! मराठी कलाकार तुषार घाडीगावकर याने नुकत्याच आत्महत्येच्या उचललेल्या टोकाच्या पावलानंतर, पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील पडद्यामागचा हा अंधार उजेडात आला. तुषारने संपवलेला जीवनप्रवास ही घटना केवळ एका कलाकाराचे दुःख नाही, तर संपूर्ण सिनेसृष्टीला विचारप्रवृत्त करायला लावणारा आरसा आहे.प्रसिद्धीच्या झगमगाटामागे एक थकलेले मनही दडलेले असते. रंगमंचावर अथवा कॅमेर्यासमोर चेहर्यावर हास्य फुललेले असले, तरी त्या हसर्या चेहर्यामागे खोलवरचे दुःखही बरेचदा दडलेले असते. म्हणूनच, जेव्हा एखादा कलाकार अचानक आयुष्याचा शेवट करतो, तेव्हा आपल्या पायाखालची जमीनच सरकते. ‘हा कठोर निर्णय का?’ हा प्रश्न अनेकांना चटका लावतो. पण, दुर्दैव म्हणजे कलाकारांच्या बाबतीत ‘त्याला किंवा तिला काम मिळत नव्हते!’ असे एक पठडीतले उत्तर उथळपणे दिले जाते. पण, हेच एकरेषीय कारण यामागे असते का? तर नाही! हे कारण एका खोल मानसिक गुंतागुंतीचे वरचे पातळ आवरण ठरावे. कलाकारांच्या आत्महत्येच्या घटना ही केवळ त्यांच्या व्यक्तिगत दुःखाची गोष्ट नसते, ती संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे ते उदाहरण असते. ही गोष्ट आहे अशा क्षेत्राची, जिथे यश क्षणभंगूर आहे आणि अपयश हे कायमस्वरूपी!
कलाकारांच्या मानसिकतेबद्दल लिहायचे झाले तर सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे की, हे क्षेत्र म्हणजे सततच्या अपेक्षांचे, नकारांचे, तुलनांचे आणि अनिश्चिततेचे रणक्षेत्र. कलाकाराला नेहमी ‘तू काहीतरी मोठे करणार!’ अशी सामाजिक मांडणी दिली जाते. पण, जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत, तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वावरच स्वत:लाच प्रश्न विचारू लागते. पुन्हा पुन्हा ऑडिशन्स, होकाराऐवजी नकार, समाजमाध्यमांवर सततचा दबाव आणि त्यासोबत येणारी आर्थिक अस्थिरता, या सर्व गोष्टी मानसिक थकव्याचे कारण होतात. कलाकारासाठी त्याचे काम हे केवळ काम नसते, ते त्याचे अस्तित्व असते. म्हणूनच जेव्हा ते अस्तित्वच धोयात येते, तेव्हा ते जीवघेण्या विचारात रूपांतरित होते. बर्याचजणांचे म्हणणे असते, ‘सांगायचं होतं!’ पण, हा माणूस ज्याचे आयुष्यच सारे प्रदर्शनासारखे झालेले असते, तो खर्या वेदनेच्या प्रसंगी पडद्यामागे दडून गेलेला असतो, कायमचा...
मंचावर जेव्हा कलाकार उभा राहतो, तेव्हा त्याच्या चेहर्यावर असतो एक आत्मविश्वासाचा झळाळता प्रकाश. पण, अनेकदा हा प्रकाश केवळ मुखवट्यासारखा असतो. आत खोल कुठे तरी गडद अंधारच असतो. २०१५ सालानंतरच्या काळात अनेक नामवंत कलाकारांनी काही मराठी, काही हिंदी अशा वेदनेच्या गर्तेत अडकून आयुष्याला स्वतःहून पूर्णविराम दिला आणि आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले की, प्रसिद्धीच्या या झगमगाटामागे नेमके दडलंय तरी काय?
तुषार घाडीगावकर हा मराठी मालिकांचा तेजस्वी चेहरा. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा तिन्ही बाजूंनी झगडणारा हा कलाकार, शेवटी ‘काम मिळत नव्हते’ या वायाच्या भोवर्यातच हरवला. तसेच, आशुतोष भाकरेही एक प्रतिभावान अभिनेता. आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी त्यानेच समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर केला होता, ‘माणूस आत्महत्या का करतो?’ हे विचारणारा. पण, त्या प्रश्नाचे उत्तर त्याने त्याच्याच कृतीने दिल्याने, आपल्या सर्वांसाठी तो एक मोठा धक्काच देऊन गेला. हिंदी सिनेसृष्टीतही ही वेदना कमी नाही. सुशांत सिंह राजपूत, कुशल पंजाबी, प्रेक्षा मेहता, तुनिशा शर्मा यांची यादी आता फक्त वर्तमानपत्रांत वाचण्यापुरती उरलेली नाही. ही यादी समाजाच्या दुर्लक्षाची आणि कलाकारांच्या असाहाय्यतेचे प्रतिक आहे. या आत्महत्या केवळ वैयक्तिक अपयशाचे किंवा तात्कालिक तणावाचे परिणाम नसतात. त्या संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण असतात, जिथे कलाकाराचे मानसिक आरोग्य, त्याच्या अस्थिर कमाईची चिंता आणि सामाजिक दबाव यांचे कोणालाच गांभीर्य नसते. काम मिळवण्याबरोबरच कलाकाराला स्वत‘च्या अस्तित्वासाठीचाही संघर्ष करावा लागतो आणि म्हणूनच आपल्याला केवळ श्रद्धांजली वाहून चालणार नाही. या आत्महत्या टाळायच्या असतील, तर आपल्याला एकमेकांना समजून घेणे शिकावे लागेल. कलाकारांसाठी मानसिक आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हायला हवी. त्यांना सुरक्षित, तणावमुक्त व्यावसायिक वातावरण मिळायला हवे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या हसर्या चेहर्यामागील खर्या वेदना समजण्याची मानसिकताही विकसीत व्हायला हवी. कारण, शेवटी कलाकारही माणूस असतो. तो हसतो, रडतो, हरतो आणि जेव्हा त्याचे मन खचते, तेव्हा त्यालाही कोणीतरी फक्त ऐकून घ्यावे, असे वाटते.
आता बघायला गेलो, तर समस्या तशा बर्याच आहेत; पण उपाय प्रत्यक्षात कृतीतले हवे आहेत. कलाविश्वामध्ये अजूनही ‘मानसिक आरोग्य’ हा विषय संकोचाने हाताळला जातो. थेरपी घेणे म्हणजे, कमकुवतपणा असेच गृहीतक आहे. पण, नेमके हेच गृहीतक मोडण्याची गरज आहे. प्रत्येक कलावंतासाठी नवोदित असो किंवा नामवंत, नियमित थेरपी सत्रे, भावनिक सामुपदेशन सहज उपलब्ध असायला हवे. कलाकार एकमेकांशी नाते जपतात; पण व्यावसायिक स्पर्धा त्यांना एकमेकांपासून दूर करते. यादरम्यान ‘लोज सर्कल’ असणे फार महत्त्वाचे आहे. कलाकारांसाठी मनमोकळ्या गप्पांचा अनुभव घेण्यसाठी प्लॅटफॉर्म हवेत. कुणीतरी फक्त ऐकणारे हवे! डेडलाईन्स, नाईट शिफ्ट्स, सततचा प्रवास या सर्व गोष्टी कलाकारांच्या कामाचा भागच आहेत; पण त्याचवेळी विश्रांती, मनःशांती आणि कुटुंबाचे योगदान विसरू नये. प्रॉडशन हाऊस, निर्माते आणि चॅनेल्स यांनीही कामकाजाच्या तासांमध्ये माणुसकीचा विचार करावा. नवोदित कलाकारांसाठी आर्थिक नियोजन, गुंतवणूक, साईड इन्कम यांबद्दल कार्यशाळाही असणे आवश्यक आहे.
बरेचदा एखादा कलाकार त्याची कला सादर करताना जितका प्रसिद्धीस येत नाही, तितका तो त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध होतो. अशीच काहीशी घटना घडली ती अभिनेता तुषार घाडीगावकरसोबत. दि. २० जून रोजी त्याने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्येचा मार्ग पत्करला. पण, त्याच्या मृत्यूचे कारण बनले ते कामाचा अभाव; पण आत्महत्या करण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण काय हे जाणून घेण्याकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्याच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधला असता कळले की, तुषारकडे कामं नव्हते म्हणून त्याने आत्महत्या केली, यात काही तथ्य नाही. तुषारच्या आत्महत्येमागे काहीही कारण असले, तरी कोणत्याही कलाकाराने जीवनाच्या या रंगमचावर अशी अकाली ‘एक्झिट’ घेणं हे केव्हाही दुःखदायकच!
काम नाही म्हणून तुषारने आत्महत्या केली,हे साफ खोटंतुषारकडे कामं नव्हते म्हणून त्याने आत्महत्या केली, हे साफ खोटं आहे. तो सतत कार्यशील असायचा. त्याच्यासाठी कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसे. त्याला चांगली कामेही आली होती. सगळे काही व्यवस्थित होते पण, ज्यावेळी त्याने आत्महत्या केल्याचे आम्हाला कळले, तेव्हा आम्हाला धक्काच बसला. तिथून काही सुधरत नाही; तोवर माध्यमांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आणि सगळीकडे तीच खोटी बातमी-कामाच्या कमतरतेमुळे तुषारने आत्महत्या केली.
- अभिजीत मोहिते, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता
नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलून बघाकलाकारांच्या आत्महत्येचे कारण आहे ‘ग्लॅमर.’ सतत प्रसिद्धी कशी टिकवून ठेवता येईल, याचा अतिविचार करणे. मग त्यासाठी अमलीपदार्थांचे व्यसन, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, वेळेवर झोप नाही; या सगळ्या क्षुल्लक वाटणार्या गोष्टी माणसाला आतून पोखरत जातात. अशाने माणूस नैराश्याकडे वळतो आणि तिथून प्रवास सुरू होतो, तो माणसाच्या शेवटाचा! बर्याचदा आपण बाहेरच्या विश्वात इतके रमतो की, आपण कोण आहोत, काय करतो, हे सगळे अगदी सहज विसरून जातो. मग बाहेरची स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिवस-रात्र केलेली स्वतःच्या शरीराची आणि मानसिकतेची फरफट. या सगळ्यांमधून जरा कुठे काम थांबले की, जवळच्या माणसांना लांब आणि वाईट सवयींना कवटाळून बसायचे. पण, तेच जर कलाकारांनी असा विचार केला तर, आज काम नाही आहे तर काहीतरी नवीन वाचूया, काहीतरी नवीन करून पाहूया, तर यामुळे एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुमचाच विकास होणार आहे. प्रत्येक गोष्टीवर एक उपाय असतो. नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलून बघा. आयुष्य अजूनच सुंदर वाटेल.
- डॉ. हरिश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ
तुषारने जे पाऊल उचलले ते अन्य कोणी उचलू नयेमला बर्याच कलाकरांनी फोन केला. कारण, तुषार त्यांच्या जवळचा होता. तुषारने असे पाऊल का उचलले? पोलिसांच्या तपासात काही समोर आले का? थोडे भावनिक होऊन काही कलाकारांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले, तर त्याचा विपर्यास करण्यात आला. काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे जसे घडले, तसे आम्ही जवळच्या मित्रांनी तातडीने कमेंट्स करून त्यांना विनंती केली की, ’कृपया कामाचा अभाव हे कारण सांगू नका’. कारण, तुषारकडे कामं होती. मी आणि तुषार एकत्र काम करायचो. माझ्या कित्येक उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग कायमच असायचा. बर्याच कलाकारांचा टोकाचा निर्णय घेण्यामागचे कारण मानसिक स्वास्थ्य असू शकते. प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे पण, हा निर्णय का घेतला जातो? हे प्रकाशझोतात येणेही तितकेच गरजेचे आहे. पण, यादृष्टीने आम्ही दि. ११ जुलै रोजी मानसिक आरोग्य शिबीर ‘वन्यवाणी’ आणि ‘सोशल सर्विस लीग’च्या मार्फत आयोजित कार्यक्रमातून, तुषारला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तुषारने जे पाऊल उचलले, तसे टोकाचे पाऊल कोणीच उचलू नये या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न होईल.
- मकरंद सावंत, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता