मुंबई : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हटके टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. येत्या २२ ऑक्टोबर दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. घटस्फोटासारख्या सामाजिक विषयावर भाष्य करत, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. तरुण आणि वयस्क अशा दोन्ही प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली. त्यामुळे आता 'प्रेमाची गोष्ट २'बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'प्रेमाची गोष्ट' ने जसा संवेदनशील विषय मांडत मनोरंजन दिलं, तसंच काही तरी अधिक प्रभावी'प्रेमाची गोष्ट २' मधून पाहायला मिळेल, अशी आशा आहे.
टीझरमध्ये ललित प्रभाकरसह अभिनेता स्वप्नील जोशी व भाऊ कदमही दिसत आहेत. आबुराव आणि बाबुराव अशी यांच्या पात्राची नावे असून त्यांनी चित्रपटाला अजूनच रंगत आणली आहे. टीझरमध्ये ललित घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात आलेला दिसत आहे. प्रेमात त्याचा निर्णय चुकल्यामुळे तो देवाला दोष देत असल्याने प्रत्यक्ष देवानेच ‘होऊ दे तुझ्या मनासारखं’ म्हणत त्याला त्याच्या नशीबातलं प्रेम बदलण्याचा एक चान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संधीने ललितचे नशीब खुलेल का? हे पाहाणे नक्कीच रंजक ठरेल. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरसह अभिनेत्री ऋचा वैद्य व रिधिमा पंडित यांचा दमदार अभिनय पाहायला मिळेल.
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, "आजच्या पिढीच्या प्रेमाकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनला साजेशी अशी अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी याआधीही सुपरहिट प्रेमकथा असलेले चित्रपट केले आणि आता अशीच एक सुपरहिट व हटके प्रेमकथा आम्ही सादर करणार आहोत."
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, "ही एक अशी फ्रेश प्रेमकहाणी आहे, जी व्हीएफएक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होतो. लवकरच प्रेक्षकांना ही प्रेमाची गोष्ट पाहायला मिळेल."
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या २२ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळेल.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.