ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीती।

    12-Jul-2025   
Total Views |
 
Padma Shri Girish Prabhune
 
भटके-विमुक्त आणि अशाच प्रकाराच्या सर्वच शोषित-वंचित समाजबांधवांचे ‘काका’ म्हणून परिचित असलेले प्रभुणे काका म्हणजे ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे. यमगरवाडी, अनसरवाडा, गुरुकुलम् अशा अनेक समाजहिताच्या प्रकल्पांना भेट दिल्यावर काकांचे कष्ट आणि समाज तपश्चर्या जाणवते. त्यांच्या प्रयत्नांनी उभे राहिलेले सर्व समाजप्रकल्प म्हणजे एक अध्याय, एक अथांग प्रेरणाच! या समाजप्रकल्पांचा आणि समाजघटकांचा मागोवा घेताना ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे नावाच्या माणसाचे माणूसपण समजत जाते. त्या माणूसपणाच्या समाज जाणिवेचा मागोवा घेणारा हा लेख.
 
पपुल्या-बिगुल्या खतरनाक आहेत. त्यांनी शेकडो खून केलेत, शेकडो आया-बायांवर बलात्कार केलेत, लूटमार केली. ते पपुल्या आणि बिगुल्या सापडायला हवेत.” पोलीस अधिकारी हताशपणे प्रभुणे यांना सांगत होते. पारधी कुटुंबांना न्याय मिळावा, म्हणून गिरीश प्रभुणे आणि रमेश, सुरेश यांच्यासह पारधी कुटुंब पोलीस अधिकार्‍यांना भेटायला गेले होते. तिथून बाहेर पडल्यावर ती पारधी कुटुंब अस्वस्थ होत प्रभुणेंना म्हणाली, “ते पोलीस खोटं बोलतात. पपुल्या-बिगुल्याने इतके 100च्यावर खून आणि बलात्कार केलेच नाहीत.” यावर प्रभुणे म्हणाले, “असं का? इतके गुन्हे केलेत म्हणून तर फरार आहेत ना?” यावर त्यातला एकजण म्हणाला, “नाही ते फरार नाहीत. आपल्यासोबत जे रमेश आणि सुरेश आहेत, तेच पपुल्या आणि बिगुल्या आहेत. विचारा त्यांना!” मग इतका वेळ गप्प असलेले रमेश, सुरेश म्हणाले, “आम्हीच पपुल्या-बिगुल्या आहोत. पण, आम्ही तर इनमिन चारच खून केलेत.” गेले अनेक महिने ज्या बांधवांच्या न्याय्य-हक्कांसाठी आपण काम करत होतो, त्या बांधवांमध्येच पोलिसांच्या मते ‘वॉन्टेड’ असलेले रमेश, सुरेश उर्फ पपुल्या-बिगुल्या हे पण होते? हे सगळे पाहून, ऐकून कोणतीही व्यक्ती अस्वस्थ झाली असती. पण, समाज प्रवाहाबाहेरच्या या समाजबांधवांचे जीवन प्रभुणे यांनी नुसतेच जवळून पाहिले नव्हते, तर त्या जीवनाचे दुःख, न्याय-अन्यायाची परिभाषा त्यांच्या हृदयात कोरली गेली होती. त्यांनी विचार केला की, पपुल्या- बिगुल्या यांना हकनाक शेकडो खून आणि बलात्कार, दरोड्याचे गुन्हेगार बनवले गेले आहे. यातून त्यांची सुटका करायलाच हवी. त्यांनी पपुल्या-बिगुल्यांना सांगितले, “तुमचा गुन्हा मान्य करा, पोलीस अधिकार्‍यांशी मी बोलतो. तुम्हाला कमीत कमी शिक्षा होईल असे बघतो.”
 
विशेष म्हणजे, या दोघांनीही प्रभुणे यांचे म्हणणे मान्य केले. विचार करा, खून म्हणजे हातचा मळ असलेल्या व्यक्तींना त्यांच्या गोतावळ्यामध्ये समजावणे की, “तुम्ही खून केलात, आता पोलिसांत हजर व्हा,” ही हिंमत प्रभुणे यांच्यात कुठून आली असेल? बरं ते लाख म्हणाले; पण त्यांनी जे म्हटले, त्यातून आपल्याला त्रासच होईल, तरीसुद्धा पोलिसांकडे स्वतः जायचे. जे काही होईल ते प्रभुणे काका बघून घेतील, असा विश्वास पपुल्या-बिगुल्यालाच नव्हे, तर सबंध शोषित-वंचित नडलेल्या समाजांना का वाटला असेल? प्रभुणे यांच्यावर पारधी, वडार, मरीआईवाले समाज, मसणजोगी, गोपाळ कोल्हाटी, भिल्ल, बेल्हार आणि अशाच समाजबांधवांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. प्रभुणे यांना सामाजिक प्रकल्प उभारणीसाठी त्या त्या समाजातीलच अनेक लोकांनी योगदान दिले. अगदी अख्खे आयुष्यसुद्धा समर्पित केले! समाजाचा प्रभुणे यांच्यावर असलेला निर्मळ विश्वास हे अलौकिक आणि देवदुर्लभ आहे. तसेच, समाजबांधवांनी मूळ समाजप्रवाहात यावे, यासाठी प्रभुणे यांनी समाजाला दिलेली ती शपथ, ‘मी चोरी करणार नाही, शिकार करणार नाही, माझ्या बायकोला किंवा नवर्‍याला सोडणार नाही, कोणतेही भांडण आपसात सोडवू, कोणताही चांगला उद्योग करून, कष्ट करत जगेन’ ही शपथ प्राणापेक्षाही जपणारे हे समाजबांधव! “काका, तुम्ही म्हणताल तसं.” असे शब्द या बांधवांच्या ओठावर मनापासून कसे बरे आले? ही एक साधना आहे. समाजसाधना! या समाजसाधनेचे गिरीश प्रभुणे समाजऋषी आहेत. हे सगळे प्रभुणे यांना कसे जमले असेल बरं? तर प्रभुणे यांच्याच शब्दात-
 
‘चलना राह नाजूक हैं,
हम न सिर बोझ भारी क्या!’
 
हे ओझं खूप भारी आहे आणि हा रस्ता खूप नाजूक आहे. पण, यातच तर आनंद आहे. हे ओझं ओझं वाटत नाही. कार्याची एक नशा यावी लागते. त्या धुंदीत मस्त फकीर बनून चालत राहावे लागते. पू. बाळासाहेब देवरस यांच्या भाषेत बोलायचे, तर देवदुर्लभ कार्यकर्ता, तर प्रभुणे हे असे देवदुर्लभ कार्यकर्ते आहेत.
 
असो. सधन आणि आपल्यापेक्षा जातीने उच्च असलेल्या व्यक्ती आपल्यावर अन्यायच करणार, आपला तिरस्कारच करणार, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला विरोधक आहे, असा गैरसमज काही स्वार्थी लोक वंचित समाजबांधवांमध्ये पसरवत असतात. या अनुषंगाने जातीने ब्राह्मण असलेल्या आणि त्यातही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या गिरीश प्रभुणे यांनी अठरापगड जातसमूहांच्या घरामध्ये ‘काका’ म्हणून हक्काचे, आदराचे आणि विश्वासाचे स्थान मिळवणे, हे सोपे अजिबात नाही. जातीयतेच्या विरुद्ध दिशेचे चटके प्रभुणे यांनाही बसलेच. पालात राहणार्‍या, डोंगर-दर्‍यांत राहणार्‍या बांधवांनी सुरुवातीला त्यांना स्वीकारलेही नाही. ‘सब समाज को साथ लिए,’ पण, कसे? ‘न हिंदू पतितो भव!’ पण, नेमके कसे? हा प्रश्न त्यांनाही अनेकवेळा पडला असेलच. पण, प्रभुणे यांना पू. गोळवलकर गुरुजींच्या विचारांनी नेहमीच मार्ग दाखला. गुरुजी म्हणाले होते, “इतिहासातील, पुराणातील उदाहरणे शोधायला हवीत. या जाती-जमातींचा उज्ज्वल इतिहास हा सर्वांसमोर ठेवायला हवा. स्पृश्यांच्या मनातला संकुचित भाव बदलल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही. त्यासाठी दोन्हींमधले समान दुवे शोधून समोर ठेवायला हवेत. वाईट गोष्टींची चर्चा आत फार झाली,” हा विचार प्रभुणे यांच्या जीवनाचे सूत्र बनले. त्यामुळेच तर कष्टकरी समाजाचे वैभवशाली ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. तसेच, आपण पाहतो की, समाजाच्या एका गटाला थोडे सहकार्य केले की, काही लोक लगेच स्वतःला त्या समाजाचे तारणहार मानतात. स्वयंघोषित नेतेही बनतात. मात्र, प्रभुणे यांनी तसे केले नाही. त्यांनी त्या त्या समाजाच्या सामाजिक संस्था निर्माण केल्या. न जाणे किती पिढ्या अन्याय-अत्याचाराच्या गर्तेत आकंठ बुडालेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्याच समाजात नेतृत्व उभे केले.
 
श्रीगोंदा इथल्या बेलवंडीमधली घटना. इथल्या शोषित-वंचित समाजाला न्याय मिळवून देऊ असे म्हणत, मानव हक्कवाल्यांनी ‘जमीन बळकाव’ आंदोलन केले. त्यांच्यावर विश्वास ठेवून भाबड्या समाजबांधवांच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केले. यावर वनखात्याने या लोकांवर खटला दाखल केला. जमीन तर मिळाली नाहीच, उलट न्यायालयीन कचेर्‍यांचा ससेमिरा त्यांच्यापाठी लागला. दुसरीकडे मानवहक्कवाल्यांनी जमिनी मिळवून देऊ असे म्हणत, या लोकांकडून पैसे उकळले होते आणि पैसे घेऊन त्यांनी तिथून पोबारा केला. या सगळ्यामुळे पारधी, भिल्ल समाजाचे हे लोक प्रभुणे यांना भेटायला आले. ते प्रभुणे यांना म्हणाले, “काका, तुम्ही सांगाल तसं करू.” त्यावर प्रभुणे म्हणाले, “तुम्ही केव्हा शहाणे होणार? किती दिवस दुसर्‍यांच्या हाताने पाणी पिणार? असं करून नाही चालणार. तुमच्यातलाच कुणी एकजण पुढे यायला हवा. त्याला तयार करू सर्व विषयात.” हाच विचार मनात घेत प्रभुणे यांनी प्रत्येक समाजात सामाजिक नेतृत्व उभे केले.
 
यमगरवाडी प्रकल्प असू दे की, मगर सांगवीचा प्रकल्प असू दे की, अनसरवाडा प्रकल्प असू दे की, नेर्ल्याचा प्रकल्प असू दे की, गुरुकुलम् असू दे, प्रत्येक प्रकल्प निर्मितीची एक प्रेरणादायी अथांग गाथा आहे. या सर्वांमध्ये प्रभुणे यांनी जीव ओतला आहे. या सगळ्या प्रकल्पामधून पालावर पिढ्यान्पिढ्या गेलेल्या शोषित-वंचित समाजाच्या उत्थानाचा यज्ञ अखंड सुरू आहे. हजारो मुला-मुलींना हक्काच, न्यायाच्या अस्तित्वाचं आकाश गवसलं आहे. तसेच, वंचित समाजाच्या उत्थानासाठी केवळ त्या त्या समाजातले लोकच पुढे आले नाहीत, तर जातीय आणि शैक्षणिक तसेच आर्थिक उच्च स्तरावर असलेल्या व्यक्तीही स्वतःहून या प्रकल्पामध्ये निस्वार्थीपणे काम करायला पुढे आल्या. हे प्रकल्प चालवणे म्हणजे काय असते, याचा आलेला अनुभव सांगायलाच हवा.
काही आठवड्यांपूर्वी प्रभुणे काकांच्या चिंचवड येथे सुरू केलेल्या ‘समरसता गुरुकुलम्’ येथे गेले होते. ब्राह्मण आळीमध्ये असलेल्या या ‘गुरुकुलम्’मध्ये भटक्या-विमुक्त, आदिवासी तसेच, मागासवर्गीय समाजाची मुलं विद्यार्थी आहेत. गरिबी आणि शतकांचे अत्याचार याने त्यांच्या पिढ्यान्पिढ्या शोषित असणारच. या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षणही शिकवले जाते.
 
इथेही बालक रानपाखरांसारखी मुक्त विहरत होती. डोळ्यात भीतीऐवजी आयुष्याबद्दलची आशा होती. मी पाहिले की, गेटच्या बाहेर जवळजवळ 15 ते 20 लोक अत्यंत आनंदात एकत्र बसले होते. मात्र, ते सगळे मूलभूत सुविधांपासून वंचितच दिसत होते. मी या लोकांना विचारले की, “तुम्ही कोण आहात?’ तर ते म्हणाले, “आमची लेकर इथं प्रभुणे काकांकडे शिकायला आहेत. काका मायबापापरीस जास्त काळजी घेतात. आम्ही दर महिन्याला काकांना भेटायला येतो. काका जीव लावतात. चार शब्द प्रेमाचे बोलतात. त्यांच्याकडून नवीन माहिती मिळते. काका आमची उपासमार होऊ नये, म्हणून शिधा धान्य पण देतात.” हे सगळे ऐकून मन अंतर्मुख झाले. कारण, ही पोरंबाळं शिकली, तर या पालकांचेच भले होणार होते. पोरांच्या शिक्षणामध्ये कसलीही आडकाठी नको, म्हणून प्रभुणे या पालकांच्या समस्या जाणून त्यातून मार्ग काढत होते. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ ही प्रतिज्ञा आपण सर्वांनी म्हटलेली असते. पण, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, या उद्दिष्टाने आयुष्य खर्ची घातलेले गिरीश प्रभुणे आणि रा. स्व. संघ तसेच, समाजाच्या समन्वयातून निर्माण झालेले सगळेच प्रकल्प म्हणजे समरस समाजाचे आश्वासक रूप आहेत. याच अनुषंगाने एकदा रमेश पतंगे यांना मी विचारले की, सर प्रभुणे काकांनी त्यांच्या कार्यासंदर्भात नेहमीच तुमच्यासह अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या सहकार्याबद्दल लिहिलेले आहे. यावर पतंगे सर म्हणाले होते, असं आहे ना, सूचना मार्गदर्शन करणं सोपच असतं; पण प्रत्यक्षात रणांगणावर उतरून स्वतःसाठी नाही, तर शोषित-वंचितांसाठी समाजहिताची लढाई लढणे हे महाकठीण काम. गिरीशने आयुष्यभर समाजबांधवांसाठी काम केले. यात त्याला वैयक्तिक लाभ झाला नाही. अनेकदा काही चूक नसताना बदनामी, नुकसानच झाले. पण, त्याची पर्वा त्याने केली नाही. कारण, गिरीश म्हणजे
 
ऐसी कळवळ्याची जाती।
करी लाभाविण प्रीती॥
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.