मुंबई : मुंबईतील धार्मिकस्थळे भोंगेमुक्त झाल्याची माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. यापैकी मुंबईत १ हजार ६०८ भोंगे हटवले असून, त्यात १ हजार १४९ मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारे आणि १४७ इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर आता भोंगा नाही. यासंदर्भातील अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राने भोंग्यांबाबत मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. पोलिसांचे विशेष कौतुक करताना फडणवीस म्हणाले, १ हजार ६०८ भोंगे हटवताना चर्चा करून, न्यायालयाचा आदेश दाखवून आणि समंजसपणे कारवाई करण्यात आली. यामुळे कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही, तसेच एकही एफआयआर दाखल करण्याची गरज पडली नाही. मुंबईला भोंगेमुक्त करण्याचे श्रेय पोलिसांना जाते. एसओपीची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे. जर पुन्हा कुठे भोंगे लावले गेले, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला (इंचार्ज) जबाबदार धरले जाईल.
मुनगंटीवार यांनी उत्तर प्रदेशातील ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठीच्या भरारी पथकांचा दाखला देत, दंडाच्या ५० टक्के रक्कम तक्रार करणाऱ्या देशभक्त नागरिकाला द्यावी, अशी मागणी केली. त्यावर तक्रारकर्त्याला दंडाच्या ५० टक्के रक्कम देण्याचा विचारही सरकार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आ. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले, परंतु गणपती, नवरात्र आणि दहीहंडी यांसारख्या सणांदरम्यान मिरवणुकांसाठी मंडळांना त्रास दिला जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, सणांच्या वेळी तात्पुरती परवानगी देऊन भोंगे लावण्यास मुभा दिली जाते. पोलिसांना कोणालाही विनाकारण त्रास न देण्याच्या सूचना दिल्या जातील.
भास्कर जाधव यांनी सुप्रीम कोर्टाच्या रात्री १० वाजेपर्यंत भोंगे लावण्याच्या आदेशाचा उल्लेख करत, कोकणातील शिमगा, गणपती यांसारख्या रात्रीभर चालणाऱ्या सणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा कायदा १५-२० वर्षांपासून अस्तित्वात आहे. भजन, कीर्तन, टाळ वाजवण्यास परवानगी आहे, पण भोंगे लावता येणार नाहीत. विशिष्ट सणांच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली जाते. बंदिस्त ठिकाणी भोंगे लावण्यास मुभा आहे, परंतु उघड्यावर आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये, हा उद्देश आहे. गुजरातमध्ये साउंडप्रूफ मंडपात नवरात्र साजरी केली जाते, असा दाखलाही त्यांनी दिला.
सर्व आयुक्तालयांमध्ये फिरते पथक
- जितेंद्र आव्हाड यांनी ख्रिस्ती समाजाच्या ख्रिसमस सणासाठी रात्रीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच राष्ट्रीय उद्यानातील पार्ट्यांमुळे होणारा गोंधळ आणि पर्यावरणाचा मुद्दा मांडला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंची विनंती असल्यास परवानगी दिली जाईल. राष्ट्रीय उद्यानातील गोंधळावर पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले जातील. तसेच सर्व आयुक्तालयांमध्ये फिरते पथक स्थापन केले जाईल.
- आ. देवयानी फरांदे यांनी ११ एप्रिल २०२५ च्या पत्रकाचा उल्लेख करत, मुंबईप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात कारवाई होणार का, असा सवाल केला. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उर्वरित १,७५९ भोंगे बंद करण्यात आले आहेत. कुठेही भोंगे आढळल्यास कायद्याने कारवाई केली जाईल.
- विश्वजीत कदम यांनी सांगलीतील मोठ्या स्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा, विशेषत: लहान मुलांच्या कानांना आणि लेझरमुळे डोळ्यांना होणाऱ्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सांगलीत गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव डॉल्बीमुक्त झाला आहे. कायद्याचा चाप बसवला जाईलच, पण अशा भावनात्मक गोष्टी समंजसपणे सोडवल्या जाव्यात, असे ते म्हणाले.