मुंबई : मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. याबद्दल स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "काही लोकांनी तक्रार केल्यानंतर मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. आयकर विभाग त्यांचे काम करत असतो आणि त्यांना सहकार्य करणे ही आमची भूमिका आहे. २०२४ ला मी निवडणूक लढवली असता त्यावेळी दिलेल्या शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेत तफावत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यांनी याबद्दलचे स्पष्टीकरण मला मागितले आहे. मी त्यासाठी त्यांच्याकडे वेळ मागून घेतली आहे. सरकारी यंत्रणेला आम्ही सहकार्य करणार आहोत," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "यावरून काही पत्रकारांनी मला श्रीकांत शिंदेंसुद्धा नोटीस मिळाली का, असे विचारले. श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली की, नाही याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. परंतू, हे वाक्य माझ्या तोंडी घालण्यात येत आहे. त्यामुळे कृपया हा गैरसमज पसरवू नये," असेही ते म्हणाले.