गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून मान्यता ; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

    10-Jul-2025   
Total Views |

मुंबई : १०० वर्षांहून अधिक काळाची समृद्ध परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार, दि. १० जुलै रोजी ही घोषणा विधानसभेत केली.

विधानसभेत निवेदन करताना शेलार म्हणाले, "लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सुरू केलेला हा उत्सव सामाजिक, राष्ट्रीय, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वभाषा यांच्याशी निगडित आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान आहे. या उत्सवाची व्याप्ती आणि सांस्कृतिक महत्त्व वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे."

काहींनी गणेशोत्सवाच्या परंपरेला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व अडथळे दूर केले. विशेषत: पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्त्यांवरील बंदीच्या मुद्द्यावर, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या संमतीने आणि राजीव गांधी विज्ञान आयोगाच्या काकोडकर समितीच्या अहवालानंतर, पीओपी मूर्त्या पर्यावरणपूरक असल्याचे सिद्ध झाले. यामुळे पीओपी मूर्त्या बनवणे, प्रदर्शन आणि विक्री यांना न्यायालयीन परवानगी मिळाली.

शेलार पुढे म्हणाले, "महायुती सरकार गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी पोलीस सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विशेषत: पुणे, कसबा आणि संपूर्ण राज्यातील गणेशोत्सवासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करेल. गणेशोत्सव मंडळांनी देखाव्यांमध्ये सैन्य, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशातील विकासकामे आणि महापुरुषांचा समावेश करावा. पर्यावरणपूरक आणि सामाजिक भान जपणारा हा उत्सव 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे."

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.