मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील श्री खंडोबा टेकडीवरील ३०० झाडे तोडणाऱ्या बिल्डरची चौकशी करून, दोषी आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत केली. भाजप आमदार राम कदम यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता.
राम कदम म्हणाले, "घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील श्री खंडोबा टेकडीवरील ३०० झाडे तोडण्यामागे बिल्डरचा हात आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. तसेच, या टेकडीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण करावे. सिलिकॉन व्हॅली प्रकल्पासाठी डोंगर पोखरले जात असून, याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी."
वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले, "खंडोबा टेकडीवरील झाडे तोडल्याप्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदवला जाईल. दोन्ही टेकड्यांवर वनीकरण केले जाईल. सिलिकॉन व्हॅली प्रकल्प वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्यास, कोणत्याही भेदभावाशिवाय कठोर कारवाई केली जाईल."