लाडक्या बहिणींनो, बँक खातं चेक केलं का? मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

    05-Jun-2025
Total Views |
 
Ladki Bahin Yojana
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवार, ४ जून रोजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली.
 
 
 
लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. दरम्यान, आता हा निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दल मंत्री आदिती तटकरे आपल्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे."
 
 
लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरूच राहणार!
 
"महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणइ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार," असा विश्वासही आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.