नाशिकमधील ठाकरेंचा शिलेदार शिवसेनेत दाखल! विलास शिंदेंच्या प्रवेशाने उबाठा गटाला खिंडार

    30-Jun-2025
Total Views | 14


मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, किशोर अप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबाडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


याप्रसंगी नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे उप महानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये, सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डीले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "विलास शिंदे यांच्या घरातील लग्नसोहळ्याला मी गेलो तेव्हापासून मला त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत होते. मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला. आज त्यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काहींची अवस्था 'शोले' सिनेमातील आसरानीसारखी!

"आज त्यांचा पक्षप्रवेश होत असताना काहींनी कोण विलास शिंदे असा प्रश्न विचारला. अयोध्येत जाताना त्यांना सोबत विलास शिंदे हवा होता, निवडणुकीत काम करताना विलास शिंदे हवा होता, वारंवार आपल्याला एकत्र काम करायचे आहे असं त्यांना सांगितले जात होते. मात्र आता पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाल्यावर कोण विलास शिंदे? असा प्रश्न विचारला जात आहे. असेच धोरण राहिले तर एक दिवस तुम्ही कोण? असा प्रश्न लोकं विचारल्याशिवाय राहणार नाहीत. काही जण 'कम ऑन किल मी' म्हणत आहेत. मात्र त्यांची अवस्था आज 'शोले' सिनेमातील आसरानीसारखी झाली आहे. त्यामुळे जेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात लढायला उतरतील तेव्हा मागे कुणी राहील की, नाही ते सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी होणारी गळती थांबवायची कशी, असा प्रश्न उबाठा यांना पडला आहे. त्यामुळे ज्यांना संपलेला पक्ष म्हणत होते त्यांना अगतिक होऊन युतीसाठी प्रस्ताव पाठवत आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121