राज-उद्धव एकत्र येऊ नयेत, असा ‘जीआर’ मी काढला नाही! - मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला; त्यांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावे आम्हाला आनंदच

    30-Jun-2025   
Total Views |

मुंबई, राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये, असा ‘जीआर’ मी काढला आहे का? त्यांनी जरूर एकत्र यावे, एकत्र येउन क्रिकेट-टेनिस खेळावे, जेवण करावे आमची काहीच हरकत नाही. ते दोघे एकत्र येणार असतील तर आनंदच आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाच्या उपनेत्याने अहवालात हिंदीची जी शिफारस केली आहे, त्याबद्दल मात्र राज ठाकरेंनी जरूर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारावा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ३० जून रोजी दिली.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सोमवारी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अर्ज भरला आहे. मंगळवारी ५ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

त्रिभाषा सूत्राबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच हिंदीबाबतचा अहवाल आला. उबाठाचा उपनेताच या समितीत होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच घूमजाव केले. आता आम्ही समिती नेमली आहे. ही समिती ठरवेल. आम्ही कोणत्या पक्षाचे हीत बघणार नाही. महाराष्ट्रातील विदयार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचा अर्ज

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रिय निरिक्षक म्हणून केंद्रिय मंत्री किरण रिजीजू मुंबईत दाखल झाले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. मंगळवारी पाच वाजता याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप एकमेव असा पक्ष ज्यात पूर्ण लोकशाही पद्धतीने विविध निवडणूका होतात. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता वरळी डोममध्ये पदग्रहणाचा कार्यक्रम होईल त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येतील. महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर मुंबईसंदर्भात महाराष्ट्र अध्यक्ष व केंद्रिय नेतृत्व पुढील निर्णय घेतील. कोकणात आमचा विस्तार गेल्या काळात चांगल्या पद्धतीने झालाय त्यात रविंद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा राहिलाय. ते कोकणातले असले तरी त्यांचे काम केवळ कोकणापुरते मर्यादित नाही. कोकणात विस्ताराला स्कोप खूप आहे. महायुतीमुळे काही जागा लढता येत नाहीत पण कोकणातल्या कानाकोपऱ्यात संघटन उभे राहिल, असेही ते म्हणाले.

भास्कर जाधव यांचे स्टेटस बघा

- भास्कर जाधव भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, भास्कर जाधव यांच्या मनात काय, हे ते स्वत: सांगू शकतात. सध्या कविता, शेरोशायरीमधून ते मनातल्या भावना व्यक्त करतात. आता त्यांचे नवीन स्टेटस येईल. त्यावरून तुम्ही अंदाज बांधा, असेही ते म्हणाले.

- बीड अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाबाबत मला निवेदन प्राप्त झाले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मी पोलीस महासंचालकांना पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.




सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.