मुंबई : भारतीय मजदूर संघाची पत्रकार परिषद नुकतीच राजधानी दिल्ली येथे संपन्न झाली. अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिमते यांनी यावेळी माहिती दिली की, दि. २३ जुलै १९५५ रोजी स्थापन झालेला भारतीय मजदूर संघ (भा.म.सं.) येत्या २३ जुलै रोजी ७० वर्षे पूर्ण करत आहे. ७० वर्षांच्या कालखंडात भारतीय मजदूर संघाने शून्यापासून शिखरापर्यंतची वाटचाल करत श्रमिक क्षेत्रात अनेक ऐतिहासिक उपलब्धी मिळवल्या आहेत आणि इतर श्रमिक संघटनांना मागे टाकत देशातील सर्वात मोठी श्रमिक संघटना म्हणून उदयास आली आहे.
७० वर्षांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने देशभरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांबाबत सांगताना ते म्हणाले, दि. २३ जुलै २०२४ रोजी भोपाल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याचा समारोप येत्या दि. २३ जुलै रोजी एक भव्य कार्यक्रम म्हणून साजरा केला जाणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित असतील. कार्यक्रमाला समाजातील विविध मान्यवर अतिथी, लोकप्रतिनिधी, राज्य व केंद्र सरकारचे मंत्री, इतर श्रमिक संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी, समाजातील प्रमुख व्यक्ती आणि भारतीय मजदूर संघाची अखिल भारतीय विस्तारित कार्यकारिणीतील सदस्य आणि भगिनी सहभागी होतील.
संघटनेचा विस्तार, दूरदृष्टी व आर्थिक बळकटीसाठी भा.म.सं.ने राबविलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांविषयी माहिती देत ते म्हणाले, मुख्यतः 'श्रमिक महासंपर्क अभियान', 'पंच परिवर्तन' या विषयांवर व्याख्यानमाला, युवा संमेलन, महिला संमेलन इत्यादी कार्यक्रम वर्षभरात आयोजित करण्यात आले. आज भारतीय मजदूर संघासोबत देशभरात ६३०० हून अधिक ट्रेड युनियन्स संलग्न आहेत तसेच ४४ अखिल भारतीय औद्योगिक महासंघ कार्यरत आहेत. भारतीय मजदूर संघ आज विकासाच्या व्यापक टप्प्यावर पोहोचला आहे.
भारतीय मजदूर संघाने गेल्या ७० वर्षांत श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले आहे, त्यांना योग्य वेतन, भत्ता, बोनस, पदोन्नती आदींचा अधिकार मिळवून दिला आहे, तसेच “राष्ट्र सर्वोपरि” या संकल्पनेला साकार करत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागवण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक