डोंबिवली :आपल्या देशावर २५ जून १९७५ साली आणीबाणीचे संकट लादले गेले. देशभरातून जवळपास दीड लाख आंदोलकांना तुरुंगात टाकण्यात आले. डोंबिवलीतील काही सत्याग्रही देखील यात समाविष्ट होते. आणीबाणीच्या काळ्या अध्यायाला ५० वर्षे पुर्ण झाली या औचित्याने डोंबिवलीकर संघर्ष योध्दयांचा भाजपा डोंबिवली पुर्व मंडल तर्फे गौरव करण्यात आला. यामध्ये आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या १५ मान्यवरांचा समावेश होता.
यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे, पुर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, जवळपास १४ महिन्याचा कारावास भोगणाऱ्या या सत्याग्रहींचे कुटुंबवत्सल जीवन सुरू होते. अचानक घडलेल्या या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना करणे कठीण आहे. या मंडळींनी दिलेल्या योगदानामुळे पुढच्या पिढीला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यावेळी घराणेशाहीच्या मक्तेदारी विरोधात विविध विचारांचे लोक एकत्र झाले होते.
प्रास्ताविकानंतर आणीबाणीच्या काळात विविध कालावधीचा तुरुंगवास भोगलेल्या मान्यवर डोंबिवलीकरांचा शाल, तुळशी वृंदावन आणि चांदीचे नाणे देऊन सत्कार करण्यात आला. या मध्ये मंगला कुलकर्णी, शशिकांत कर्डेकर, अभय राजहंस, मोहन दातार, मुकुंद कुलकर्णी, भालचंद्र लोहोकरे, प्रमोद काणे, प्रकाश भुर्के, वसंतराव शेळके, सुरेश कुलकर्णी, वसंत देशपांडे, उमाकांत सावंत, दीपक सरपोतदार, दिवंगत कांत बाबू, दिवंगत आबासाहेब पटवारी यांना गौरविण्यात आले. दिवंगत कांत बांबू आणि पटवारी यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव यांनी सत्कार स्विकारले.
कार्यक्रमास खास उपस्थित असलेल्या सुरेश पुराणिक, श्रीपाद जोशी आणि चंद्रकांत जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारास उत्तर देताना राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष शशिकांत कर्डेकर यांनी तुफान भाषण करून सभागृहात हशा पिकवला.
या कार्यक्रमाचे आयोजन संयोजक उल्हास दाते, सह संयोजक श्रुती उरणकर आणि आशिष राजगोर यांनी उत्तमरित्या केले. मितेश पेणकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी भाजप चे नंदू जोशी, मुकुंद पेडणेकर, बाळा पवार आणि अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वर्गीय कांत बाबू यांच्या आठवणीना आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी उजाळा दिला. टेबलावर उभा राहून भाषण देणारे पहिली व्यक्ती आपण कांत बाबू यांच्या रूपात पाहिली. प्रत्येक गोष्ट संदर्भासहित सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कार्यकर्त्यांना जपणे, माणसे जोडणे ही त्यांची खासियत होती.
आबासाहेब पटवारी हे गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रेचे जनक आहेत असे गौरवोद्गार चव्हाण यांनी केले. आबासाहेब पटवारी यांच्या सोबत केलेल्या कामाचा अनुभव सांगताना माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी त्यांच्या शांत स्वभावाविषयी आदर व्यक्त केला. डोंबिवली नगराचा उपनगराध्यक्ष म्हणून आबा साहेबांनी संधी दिल्याची कृतज्ञता पाटील यांनी व्यक्त केली.