चेन्नई : मुलांकडून होणाऱ्या अवमानाचा बदला म्हणून लष्करी सैनिकाने आपली चार कोटींची संपत्ती मंदिराला दान केली आहे. तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यात ही घटना घडली. अरुलमिगू रेणूगमल अम्मान या मंदिराला त्यांनी ही चार कोटींची संपत्ती दान केली आहे. मुलांनी केलेल्या अवमानाचा बदला म्हणून ६५ वर्षीय पित्याने ही संपत्ती दान केली.
एस. विजयन, असे या निवृत्त लष्करी सैनिकाचे नाव आहे. निवृत्तीनंतर विजयन त्यांच्या पत्नीशी झालेल्या मतभेदातून तिरुवन्नमलाई येथे दहा वर्षांपासून एकटेच राहत होते. आपल्या मुलांकडून वर्षानुवर्षे वारंवार अपमानाने दुखावलेल्या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अरुलमिगू रेणूगमल अम्मान मंदिरामध्ये दर्शनासाठी विजयन गेले असता, मंदिराच्या दानपेटीत त्यांनी मालमत्तेचे कागद दान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दि. २४ जून रोजी, मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी १२.३० वाजता मोजणीसाठी दानपेटी उघडली असता त्यांना ४ कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे आढळून आली. मंदिर प्रशासनाला याच दानपेटीत विजयन यांची एक चिठ्ठीसुद्धा आढळून आली ज्यात विजयन यांनी असे लिहिले होते कि,"मी स्वेच्छेने माझ्या नावे असलेली मालमत्ता मंदिराला दान करत आहे."
याबाबत मंदिर प्रशासनाने विजयन यांच्यासोबत संर्पक केला असता विजयन म्हणाले, "गेल्या काही काळापासून आपली मुले मालमत्ता त्यांच्या नावे करून देण्यासाठी आपल्यावर दबाव आणून वारंवार अपमानित करत होते, दुखावलेल्या भावनेतून मी हा अंतिम निर्णय घेतला आहे." असे विजयन यांनी सांगितले.