'गाडी नंबर १७६०'मध्ये 'या' अभिनेत्रीने साकारले ॲक्शन सीन्स!

    25-Jun-2025   
Total Views |



this actress performed action scenes

मुंबई : तन्वी फिल्म्स प्रस्तुत 'गाडी नंबर १७६०' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स आणि टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये वेधक दृश्यांबरोबरच एक खास गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ॲक्शन सीन्स. ७७ वर्षीय सुहास जोशी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून विशेष म्हणजे काही ॲक्शन सीन्स त्यांनी स्वतः साकारले आहेत.

याबद्दल सुहास जोशी म्हणतात, ''वय कितीही असो, जेव्हा भूमिका मनापासून आवडते, तेव्हा तिच्यात पूर्णपणे झोकून देणं गरजेचं वाटतं. 'गाडी नंबर १७६०' मधील माझी भूमिका वेगळी आहे आणि त्यासाठी ॲक्शन सीन करणे हा एक नवीन आणि उत्साही अनुभव होता. मनातली जिद्द आणि अभिनयावरील प्रेम हेच मला पुन्हा कॅमेऱ्यासमोर घेऊन येतं. टीमचा पाठिंबा आणि वातावरण इतकं सकारात्मक होतं की, ॲक्शन सीन करायला भीतीच वाटली नाही.''

दिग्दर्शक म्हणतात, ''सुहास मॅडम म्हणजे एक प्रेरणा आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता आम्ही बॉडी डबल वापरण्याचा पर्याय ठेवला होता. पण त्यांनी तो साफ नाकारला. 'मी स्वतः अ‍ॅक्शन सीन करणार.' त्यांच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की आम्हाला काही क्षण अवाक व्हायला झालं. या वयातही त्यांची ऊर्जा, मेहनतीची तयारी आणि कामाबद्दलचा आदर पाहून आम्हा सर्वांना एक नवीच प्रेरणा मिळाली. खरंच, त्या आमच्यासाठी केवळ एक अभिनेत्री नाहीत, तर एक आदर्श आहेत.''

या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी असून, लेखन व दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुहास जोशींच्या अशा समर्पणातून त्यांची अभिनयावरील निष्ठा अधोरेखित होते आणि नव्या पिढीसमोरही एक प्रेरणादायी उदाहरण ठरते. आता चित्रपटात त्यांची नेमकी भूमिका काय असेल, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.