चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन, कल्याण परिमंडलात दोनच महिन्यात वीजबिल थकबाकीत २१० कोटींची भर

    25-Jun-2025   
Total Views |

कल्याण, महावितरणच्या कल्याण परिमंडलात एप्रिल आणि मे या दोन महिन्यात लघुदाब वीज ग्राहकांकडील (कृषिपंप व कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) वीजबिल थकबाकीत तब्बल २१० कोटी रुपयांची भर पडली आहे. याव्यतिरिक्त मार्च २०२५ अखेरची २५ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी तसेच जून महिन्यातील १०८ कोटी ७६ लाख रुपयांची चालू थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. परिणामी थकित वीजबिलाची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. वीज खंडितची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीजबिल तसेच सुरक्षा ठेवीचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले आहे.

मागील थकबाकी आणि जून महिन्यातील चालू थकीत वीजबिल लक्षात घेता कल्याण परिमंडलातील लघुदाब ग्राहकांकडून ३० जूनपर्यंत ३४४ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक आहे. यात कल्याण पूर्व आणि पाश्चिम तसेच डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ६० कोटी २६ लाख रुपयांचा समावेश आहे. उल्हासनगर एक आणि दोन, कल्याण ग्रामीण व बदलापूर विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत १०६ कोटी ३५ लाख रुपयांच्या वीजबिलाचा समावेश आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील ग्राहकांकडील १२३ कोटी ४३ लाख तर पालघर मंडलातील ग्राहकांकडील ५३ कोटी ९३ लाख रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.

जून अखेरपर्यंत रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून थकबाकी, चालू वीजबिल तसेच सुरक्षा ठेवीचा विहित मुदतीत भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन मिश्रा यांनी कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.