मोठी बातमी! अखेर युद्धविरामाची घोषणा, इस्रायल आणि इराणकडून शस्त्रसंधी कराराचा स्वीकार

    24-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (Israel, Iran accept ceasefire) तेहरानच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणसोबत युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यालयाने पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इराणविरोधातील युद्धात सर्व हेतू साध्य - पंतप्रधान नेतान्याहू

एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इराणसोबतच्या युद्धबंदीच्या ट्रम्पच्या प्रस्तावाला इस्रायलने सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, इस्रायलने ट्रम्प यांच्याशी समन्वय साधून इराणसोबत द्विपक्षीय युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. नेतन्याहू म्हणाले की त्यांनी सोमवारी २१ जूनला रात्री इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाला कळवले होते की, इस्रायलने इराणविरुद्धच्या १२ दिवसांच्या कारवाईत आपली सर्व युद्ध उद्दिष्टे साध्य केली आहेत, ज्यामध्ये इराणच्या आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांचा धोका दूर करणे हेही समाविष्ट आहे. इस्रायलने इराणच्या लष्करी नेतृत्वाचे आणि अनेक सरकारी तळांचेही नुकसान केले आणि तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवले, असे नेतन्याहू म्हणाले.

इराणकडून अखेर शस्त्रसंधीची घोषणा

इराणने हा शस्त्रसंधी मान्य करण्यासाठी इस्रायलवर दबाव आणला होता, असा दावा इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे. अमेरिकेने तेहरानमधील आण्विक तळावर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद या हवाई तळावर हल्ला चढवला होता या हल्ल्यामुळेच इस्रायलला शस्त्रसंधी मान्य करावा लागला, असा दावा इराणकडून आता केला जात आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\