
कल्याण :अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी कल्याण पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या कारवाई पथकाने ३ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तौसीफ आसीफ सुर्वे, लिंगराज अपाराय आलगुड आणि इरफान उर्फ मोहसीन सय्यद अशी आहे.
शहराच्या पश्चिम भागातील बकरी मंडईतून हे तिघे जात असताना त्यांना पोलिसांनी हटकले. त्यांच्याकडे कोडेन फॉस्फेट सिरप या अंमली पदार्थाच्या १०० मिलीलीटरच्या १०० बाटल्या मिळून आल्या. त्याची किंमत २७ हजार रुपये आहे. पोलिसांनी या सिरपच्या बाटल्या जप्त करुन तिघांच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तौसीफ हा कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात राहतो. तर लिंगराज आणि इरफान हे दोघे कर्नाटक राज्यातील राहणारे आहेत.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कारवाई पथकाने ही कारवाई केली आहे. सिरपच्या बाटल्या कोणाला विकण्यासाठी आणल्या होत्या. त्या कुठून विकत घेतल्या होत्या याचा पुढील तपास बाजारपेठ पोलिस करीत आहेत.