डॉ. बाबासाहेबांच्या विचारांसाठी!

    23-Jun-2025   
Total Views |

प्रतिकुलतेवर मात करत समाजात सेवाकार्याने सकारात्मकता पेरणारे मूळचे बिदरचे, पण मुंबईत स्थायिक झालेले डॉ. ओमप्रकाश गजरे त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

२००० साल होते. ओमप्रकाश हे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये ‘बीडीएस’ वैद्यकीय शाखेच्या शेवटच्या वर्षाला शिकत होते. अशातच त्यांच्या वडिलांना पक्षाघात झाला. दिवसाला ८० रुपयांची औषधे त्यांना द्यावी लागत. पण, घरची परिस्थिती अत्यंत बिकट. औषधांचा खर्च भागणार तरी कसा? ओमप्रकाश यांनी ठरवले शिक्षण सोडायचे, गावी परतायचे आणि मिळेल ते काम करून वडिलांचा उपचार करायचा. त्यांनी शिक्षण सोडायचा निर्णय घेतला, हे कळताच गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी ओमप्रकाश यांना बोलावले. म्हणाले, "खबरदार, तू शिक्षण सोडायचे नाहीस. शिक्षण सोडून पडेल ते काम करून घर चालवायचं आहे की शिक्षण पूर्ण करून चांगले भविष्य निर्माण करून आईबाबांना सन्मानित करून समाजासाठी आदर्श बनायचे आहे? तू शिक्षण पूर्ण कर. मी बघतो काय करायचे ते.” त्यांच्या आवाजात दरारा आणि त्यासोबतच आपलेपणा होता. त्यांचे म्हणणे ऐकून ओमप्रकाश यांना धीर वाटला. त्यांनी ठरवले की, आपण शिक्षण सोडायचे नाही. तसेच, म्हटल्याप्रमाणे डॉ. मानसिंग पवार यांनी बाबांच्या उपचाराचा खर्च उचलला. ओमप्रकाश यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांनी दंतचिकित्सा क्षेत्रात नामांकित आणि तितकेच सेवाभावी डॉक्टर म्हणून ठसा उमटवला.

ओमप्रकाश हे ‘संत कक्कया ढोर समाज संस्थे’चे, तसेच ‘देव देश प्रतिष्ठान’ संस्थेच्या माध्यमातून समाजोत्थानासाठी आणि पर्यावरणासाठीही ते काम करतात. शोषित, वंचित व्यक्तींनी समाजाच्या विकासप्रवाहात यावे, यासाठी जागृती करतात, आरोग्य शिबिरे आयोजित करतात. समाजातील मुलांचा उच्च शिक्षणात टक्का वाढावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मुख्यतः विविध समाजांत आपसांत स्नेह वाढावा, यासाठी समरसतापूरक काम ते सातत्याने करत असतात. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

तर, डॉ. ओमप्रकाश गजरे यांच्या आयुष्याचा मागोवा घेऊ. कर्नाटक बिदरचे गणपतराव आणि तुळजम्मा गजरे हे संतढोर कक्कया समाजाचे कुटुंब. या दाम्पत्याला सहा अपत्ये. त्यांपैकी ओमप्रकाश हे सगळ्यांत मोठे. गणपतराव एका वाहतूक कंपनीत कामाला होते. घरात सुबत्ताच होती. गणपतराव आणि तुळजम्मा मुलांना सांगत, "खूप शिका, कष्टाशिवाय पर्याय नाही.” सगळे उत्तमच सुरू होते. मात्र, ओमप्रकाश तिसर्या इयत्तेत शिकत असतानाच, गणपतराव ज्या कंपनीत काम करत होते, ती बंद पडली. त्यामुळे त्यांना मोलमजुरी करावी लागली. घरात गरिबीने हातपाय पसरले. तुळजम्मा यांनाही मंजुरीसाठी घराबाहेर पडावे लागले. आर्थिक दुर्बतलेमुळे शिक्षणाचा खर्च झेपणारा नव्हता. त्यामुळे तुळजम्मा यांनी ओमप्रकाश यांना लातूर देवणीबुद्रुक येथे त्यांच्या भावांकडे म्हणजे तुकाराम आणि ज्ञानोबा यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले. मामाकडे आल्यावर ओमप्रकाश यांनी सातवी इयत्तेत प्रवेश घेतला. त्यांचे बालपण कर्नाटकात गेले होते. त्यामुळे कन्नड भाषेत प्राविण्य होते आणि मराठी भाषेचे आकलन नव्हते. त्यामुळे सुरुवातीला शिक्षण जड गेले. काही नातेवाईक म्हणू लागले, "हा काही शिकणार नाही. बापाने तरी कुठे काय केले? वळणाचे पाणी वळणावर जाणार.” हे सगळे एकून ओमप्रकाश यांना दुःख झाले. आपण शिक्षणासाठी इथे आलो, तर शिकायचेच, हा निश्चय त्यांनी केला. तुकाराम मामा आणि ज्ञानोबा मामा यांनी त्यांच्या शिक्षणात जराही कसर ठेवली नाही. त्यामुळे ओमप्रकाश शाळेत सातत्याने प्रथम क्रमांक मिळवत राहिले. याचबरोबर त्यांनी विविध खेळांत प्राविण्य मिळवले. खेळामुळे मन एकाग्र होते. लक्ष्य साध्य करण्यासाठी बळ मिळते, असे त्यांना जाणवले. या काळातही ओमप्रकाश सुटीत मोलमजुरी करत आणि गावी आईला पैसे देत असत.

असो. दहावीनंतर त्यांनी राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरूद्ध जाधव यांनी खूपच सहकार्य केले. पुढे ओमप्रकाश यांनी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मामा सहकार्य करत होते. मात्र, महाविद्यालयाच्या वसतिगृहात निवास विनाशुल्क असला, तरी भोजनासाठी शुल्क होते. ते शुल्क त्यांना परवडत नव्हते. मग ओमप्रकाश दुपारी एकदाच मेसला जेवायचे. दुपारच्या जेवणातली एक चपाती-भाकरी वाचवून रात्री खायचे. हे कळताच महाविद्यालयाचे रेक्टर चंद्रमणी मोरे यांनी त्यांना विनाशुल्क मेसमध्ये भोजनाची सवलत दिली. या कठीण काळात नरेंद्र काळे, सचिन अंजान वगैरेंसारख्या मित्रांनी त्यांना भक्कम साथ दिली. ओमप्रकाश यांनी पुढे डॉक्टर झाल्यावर आणि आयुष्यात सर्वच स्तरांवर स्थैर्य आल्यावरही याची जाण त्यांनी कायम ठेवली. त्यामुळेच की काय, गरजू व्यक्तींच्या आधारासाठी ते नेहमी तत्पर आहेत. ते म्हणतात, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर खरंच जगायचं असेल, तर प्रथम शिकून यशस्वी समाजशील अस्तित्व निर्माण केले पाहिजे. त्याचबरोबर समाजातून अशाच प्रकारे समाजशील यशस्वी व्यक्तिमत्त्वे कशी उभी राहतील, यासाठी काम करायला हवे. डॉ. बाबासाहेबांचा वारसा जागवण्यासाठी हे करायलाच हवे.” डॉ. ओमप्रकाश समाजासाठी दीपस्तंभच आहे.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.