
पुणे : जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पतंजली परिवार युवा भारत आणि नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत इंटिग्रेटेड योगसाधना चिकित्सक शिबिर आयोजित करण्यात आले. योगऋषी रामदेव यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
योगाभ्यासाच्या माध्यमातून सहभागी नागरिकांनी शरीर, मन आणि आत्म्याला लाभणारी सकारात्मक ऊर्जा अनुभवली. योगामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक समत्व, समाधान आणि एकाग्रता प्राप्त होते, यावर शिबिरात विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमात आमदार उमा खापरे, राजेंद्र बाबर आणि जयदीप खापरे यांची उपस्थिती होती. आचार्य अतुल यांनी योगाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “नियमित योगामुळे शरीर निरोगी राहते, मन स्थिर होते आणि जीवनशैली सकारात्मक बनते. योगापासून दूर राहिल्यास आजार, तणाव आणि अनियमित जीवनशैलीचा धोका वाढतो.”
ते पुढे म्हणाले की, “आपल्या मुलांना लहान वयातच योगाचे महत्त्व समजावून द्या. त्यांच्यात पर्यावरणपूरक मूल्यांचे संस्कार रोवले गेले पाहिजेत, कारण आजची मुले हेच आपल्या समाजाचे भविष्य आहेत.”
कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक योगसाधनेतून एकात्मतेचा संदेश देण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पतंजली युवा भारत संघटना, स्वयंसेवक, मार्गदर्शक व सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.