"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

    21-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.


या संदर्भात बोलताना भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी म्हटलं की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यातील व्हाईट हाऊसमधील भेट ही पाकिस्तानसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुखांना विशेष भेटीसाठी आमंत्रित केले होते. यातून हे स्पष्ट झाले आहे की, शेजारील राष्ट्रातील निर्णायक गोष्टी पाकिस्तानी लष्कर ठरवते."

त्यामुळे ट्रम्प आणि मुनीर यांच्या भेटीबद्दल माझं काही चांगले मत नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. लष्करप्रमुखांना आमंत्रित केले जाते आणि पंतप्रधान कुठेच दिसत नाहीत? ही कोणत्याही देशासाठी शरमेची गोष्ट असेल. ही खूप विचित्र गोष्ट आहे", असे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\