डोंबिवली : डोंबिवली येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शैक्षणिक शुल्कात कपात केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवली.
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या पेंढरकर महाविद्यालयात व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार करत गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून अवाजवी प्रवेश शुल्क आकारून विद्यार्थ्यांची लूट चालविली होती. त्यावर सोनू सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील माजी आजी प्राध्यापक, माजी विद्यार्थी यांनी सेव्ह पेंढरकर महाविद्यालय ही मोहिम राबविली होती. या मोहिमेला यश आले असून महाविद्यालयात प्रशासकाची नियुक्ती केली आहे. सोनू सुरवसे यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन शुल्कवाढी संदर्भात चर्चा केली. आता महाविद्यालयीन प्रवेश शुल्कात कपात करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार शुल्क आकारण्यात आले आहे. त्यामुळे गोर गरीबांना महाविद्यालयात शिक्षण घेता येणार आहे. या आनंदात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सह्यांची मोहीम राबवली. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन सह्यांच्या मोहिमेत सहभाग घेतला.तर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मी सतत तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.
विद्यार्थ्यांनी केली मागणी
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे जे प्रयत्न सुरू केले आहेत त्यांना विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.पुन्हा या महाविद्यालयात अन्यायकारक व्यवस्थापनाला प्रवेश देऊ नये अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.कॉलेज प्रशासनाच्या प्रवेश शुल्कातील कपात व विद्यार्थी हिताच्या निर्णयांना पाठिंबा म्हणून विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबविली.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.