कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त करणार! मंत्री बावनकुळेंची घोषणा; ‘ऑपरेश थंडर’ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

    21-Jun-2025
Total Views |




नागपूर :
जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी. जनतेच्या सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शनिवार, २१ जून रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ऑपरेशन थंडर-२०२५ अंतर्गत अमलीपदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, नागपूर पोलीस परिमंडळ -५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम उपस्थित होते. यावेळी जयस्तंभ चौक ते गोयल टॉकीज पर्यंत ‘अंमली पदार्थ विरोधी रॅली’ काढण्यात आली. अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध शाळा तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "गेल्या वर्षभरात कामठी तालुक्यात अमलीपदार्थ विरोधी ३० मोठ्या कारवाया करून ६० लोकांना अटक करण्यात आली आहे. तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे एक छुपे युद्ध सुरू आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुण हे व्यसन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. कामठी शहरातही तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यात ओढणारे षडयंत्र सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने थंडर मोहीम सुरू केली आहे. जनतेने निडरपणे पोलीसांना अमलीपदार्थ विक्रेत्यांची माहिती द्यावी," असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, "येत्या काळात नागपूर शहर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत खापरा, जरीपटका हद्दीतील भागांचा समावेश असलेले नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, येथील भाजीमंडी परिसरात पोलीस स्थानक उभारण्यात येईल तसेच कामठी शहर १०० टक्के सीसीटीव्ही सर्व्हेलन्सने सज्ज करण्यात येईल," असेही त्यांनी सांगितले.