सामाजिक, कुटुंबवत्सल मंगला काकड

    20-Jun-2025
Total Views |

कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत, समाजाचे आपण देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी कायम धडपडणार्या मंगला बाळकृष्ण काकड यांच्याविषयी...

नाशिक जवळील मखमलाबाद येथील रहिवासी मंगला काकड यांना शालेय शिक्षणापासून विविध कलाक्षेत्रात काम करण्याची आवड होती. परंतु, वडिलधार्यांच्या रूढी-परंपरांना धरून चालणार्या विचारांमुळे मंगला यांच्या कलागुणांना फारसा वाव मिळाला नाही. फक्त शाळा एके शाळा असा दिनक्रम होता. मनपा शाळा क्र. १ मध्ये प्राथमिक, मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिरमध्ये माध्यमिक, तर बी. कॉमपर्यंतचे शिक्षण बी.वाय.के. महाविद्यालयामधून पूर्ण करत त्यांनी ‘जीडीसी अॅण्ड ए’देखील पूर्ण केले. यादरम्यानच त्यांनी नागरी संरक्षणदलात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्या माध्यमातून त्यांनी बेसिक, फर्स्टएड, वॉर्डन असे राज्य पातळीवरील व ‘एनडीआरएफ’चे कोर्स पूर्ण केले.

सुरुवातीला ‘पोस्ट वार्डन’ म्हणून काम केलेल्या मंगला यांनी त्यानंतर स्टाफ ऑफिसर, उपविभागीय क्षेत्ररक्षक अशा जबाबदार्या सांभाळत, आता त्या विभागीय क्षेत्ररक्षक म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच त्या भद्रकाली पोलीस ठाणे शांतता कमिटी सदस्य म्हणूनही काम करतात. सामाजिक कार्याची आवड असलेल्या मंगला नागरी संरक्षणदलात अजूनही आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. "आपल्या वाटचालीमध्ये नागरी संरक्षण दलाचे अधिकारी, कर्मचारी, सहकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याने मी आज या स्थानावर आहे,” असे सांगायला त्या विसरत नाहीत. नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून २००३ आणि २०१५ सालच्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भाविकांच्या सेवेसाठी त्यांचा सक्रिय सहभाग होता. या सेवेबद्दल मंगला काकड यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वयोवृद्धांची सेवा, कुणाच्याही सुखात सामील होण्यापेक्षा दुसर्याच्या दुःखात सहभागी होऊन दुःख कमी करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.

नागरी संरक्षण दलात काम करत असताना महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी होणार्या संचलनामध्ये मंगला काकड यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. नागरी संरक्षण दलाच्या प्रात्यक्षिक स्पर्धेत दोनदा त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच ‘नारीशक्ती पुरस्कार २०२४ आणि २०२५’, ‘अखिल भारतीय मराठा महासंघ महिला विभाग’, ‘अन्याय अत्याचार समिती’चा ‘राज्यस्तरीय पुरस्कार,’ ‘सौजन्य महिला विकास संस्थे’चा ‘सावित्रीबाई फुले महिला समाजरत्न पुरस्कार’ यांसारख्या इतरही २० ते २५ पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. आपल्या कामातील वक्तशीरपणा व प्रेमळ स्वभावामुळे त्या सर्वांच्याच लाडक्या आहेत. नागरी संरक्षण दलातील काम व सामाजिक कार्य याला समान न्याय देणार्या मंगला काकड यांना समाजातील सर्वच घटकांच्या शाबासकीमुळे अजून काम करण्याची प्रेरणा मिळते. "लोकांच्या सहकार्यामुळेच मी एवढे सगळे काम उत्साहाने आणि आनंदाने पार पाडू शकते,” असे त्यांचे म्हणणे आहे. विविध सामाजिक कार्यात काकड यांचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक कार्याबरोबरच मंगला या आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीकडेही तेवढेच लक्ष देतात. योगासनाची आवड असल्याने त्यांनी ‘योगविद्या धाम’च्या ‘प्रविण’ व ‘परिचय’ या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त वाचनाची आवड असल्याने त्यांना विविध विषयांवर वाचन करायला आवडते. समाजामध्ये वावरत असताना कणखरपणे आणि धडाडीने काम करणार्या मंगला या आपल्या कुटुंबाचा विषय निघाल्यानंतर थोड्याशा भावनिक होऊन त्यांचा आवाज कातर होतो. नावाजलेली कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या वातावरणातच लहानाच्या मोठ्या झालेल्या मंगला काकड यांच्यावर घरातील जबाबदारी फार मोठी आहे.

वडिलांच्या अकाली निधनानंतर वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. वडील देवाघरी गेले, तेव्हा घरामध्ये आई, सात बहिणी, वृद्ध आत्या अशा सर्व महिलाच होत्या. घराची जबाबदारी उचलताना कोणत्याही पुरुषाचा आधार नसल्याने, पुढे आपल्या कुटुंबाचे कसे होणार, ही चिंता सतत त्यांच्या आईला होती. कधी फारशा घराबाहेर न जाणार्या आईच्या पाठीमागे मंगला काकड या एखाद्या कर्त्या मुलाप्रमाणे ठामपणे उभ्या राहिल्या. बहिणींची लग्नं, वडिलोपार्जित शेती, आई आणि आत्याची जबाबदारी त्यांनी हसत स्वीकारत लीलया पार पाडली. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक आईच्या निधनानंतर मात्र, मंगला काकड स्वतःला फार एकट्या समजतात. त्यामुळेच त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले आहे. सामाजिक कार्य, कुटुंबातील जबाबदारी, शेती, नागरी संरक्षणदलातील कार्य प्रभावीपणे पार पाडणार्या मंगला यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक मान्यवरांचे प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. आतापर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग, रक्तदान शिबीर, महिलांसाठी कराटे व आत्मसंरक्षण प्रशिक्षण, स्वच्छता मोहीम अशा सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. सततचे प्रोत्साहन व स्वतःवर असलेल्या जबाबदारीची जाणीव असलेल्या मंगला यांना आपल्याकडून आणखी चांगले कार्य घडावे. तसेच, समाजासाठी आपण कायम उपयोगी पडावे, अशी इच्छा आहे. त्यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८