हॉटेल विट्स खरेदी प्रक्रियेतून संजय शिरसाटांची माघार! विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले, "दम असेल तर..."

    02-Jun-2025
Total Views |
 
Sanjay Shirsat
 
छत्रपती संभाजीनगर : हॉटेल विट्स खरेदी प्रकरणावरून सध्या राज्याचे राजकारण तापले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, आता मंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल विट्स खरेदी प्रक्रियेतून माघार घेत विरोधकांना ओपन चॅलेंज दिले आहे. सोमवार, २ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
 
छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये असताना संजय शिरसाटांच्या मुलाने ते केवळ ६७ कोटी विकत घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर आता संजय शिरसाटांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "माझ्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हॉटेल विकत घेतले. विट्स हॉटेल हे एक आमच्याकडे एक मोठे हॉटेल आहे. गेली अनेक वर्षे त्या हॉटेलच्या भागधारकांमध्ये असलेल्या व्यवहारांमुळे ते कोर्टात गेले. कोर्टाने त्या भागधारकांचे पैसे देण्यासाठी त्या हॉटेलचा लिलाव करा असे आदेश दिले. यापूर्वी जवळपास सात वेळा त्या हॉटेलच्या लिलावाची नोटिस काढण्यात आली. परंतू, कुणीही ते हॉटेल घेतले नाही. त्यानंतर आठव्या वेळी माझ्या मुलाने आणि ते टेंडर भरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक प्रक्रिया असते. त्यानुसार, त्यासाठी आवश्यक ती रक्कम भरावी लागते. त्यानंतर आपल्याला एक पत्र मिळते आणि ९० दिवसात उर्वरित रक्कम भरावी लागते. हा प्रक्रियेचा भाग आहे. परंतू, काही लोकांना यात काहीतरी मोठं झाल्यासारखं वाटलं. काही जणांनी मुर्खासारखे वक्तव्य करण्यास सुरुवात केली. कमीत कमी आधी तो व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता. त्यानंतर पैसे कुठून आले, कसे आले याबद्दल चौकशी करायला हवी होती. परंतू, त्यापूर्वीच वाद सुरु झाले."
 
 
दम असेल तर...
 
"सातवेळा टेंडर कुणी भरले नाही. त्यामुळे आठव्या वेळेस आम्ही प्रयत्न करून ते टेंडर घेतले असेल तर मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्या दलाल लोकांना एवढा का पोटशूळ उठला? एकदा प्रक्रिया तरी पूर्ण होऊ द्या, मग आरोप करा. त्यामुळे मी आज एक निर्णय घेतला आहे. ११० कोटी आहेत ना? संजय राऊतांना चुकीची माहिती मिळाली आहे. तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभे करत नाही. मी कधी बँकेच्या दारात गेलो नाही तर लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन येतात. मी माझ्या मुलाला टेंडरमधून बाहेर पडण्यास सांगणार आहे. तुमच्यात दम असेल तर तुम्ही ते टेंडर भरा आणि हॉटेल घ्या," असे चॅलेंज त्यांनी दिले आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. एखाद्याच्या घरात घुसून त्याने काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा मुर्खपणाच्या आहेत. राजकारण करताना समोरासमोर करायला हवे. मी उद्या माझ्या मुलाला या टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडायला लावणार आहे. जे ११० कोटींच्या गप्पा करतात आता त्यांनी हॉटेल घ्यावे. मी तुमच्या घरी पेढे घेऊन येईल. संजय राऊत तुम्ही एका व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीच्या कामात खोडा घातला आहे. यापुढे जर तुम्ही वैयक्तिक आरोप करत असाल तर मलासुद्धा तुमच्याबद्दल सगळे माहिती आहे. माझ्या नादी लागू नका. तुम्ही राजकीय आरोप प्रत्यारोप करा. परंतू, व्यवसायाबद्दल आणि मुलाबाळांबद्दल चर्चा केल्यास त्याचे परिणाम निश्चितपणे दिसून येतील," असा इशाराही संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना दिला आहे.