आतेफाचा इराणला शाप

    19-Jun-2025   
Total Views |

इस्रायलने इराणची सरकारी दूरदर्शन वाहिनी हॅक केली आणि त्या वाहिनीवर व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये महिलांनी केस मोकळे सोडले होते. काही महिला रस्त्यावरच स्वतःचे केस कापत होत्या. इराणमध्ये इस्रायलने शस्त्र, अस्त्र हल्ले करून जितकी हानी केली, त्यापेक्षा जास्त हानी आणि अपमान एका व्हिडिओमुळे इराणचा झाला. कारण, याच इराणमध्ये महिलांच्या डोक्यावरचा एक केस दिसला, म्हणून महिलांच्या हत्या झालेल्या आहेत. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात शेकडो लोक फासावर गेले. हजारो लोक तुरुंगात खितपत पडले. त्यामुळेच कट्टरपंथी इराणमध्ये दूरदर्शनवर असा व्हिडिओ प्रसारित होणे, म्हणजे भयंकर आक्रित होते.

याच हिजाबविरोधी आंदोलनात मेहसा अमिनचा इराण सरकारने खून केला होता. निका शाकर्रामी तसेच, हदिस या अल्पवयीन मुलींची ही हत्या हिजाबविरोधामुळेच करण्यात आली. इतकेच काय, तर इराणच्या राष्ट्रीय बॉक्सिंग टीमचा सदस्य बॉक्सिंग चॅम्पियन रेजा मोरादखानी याला पोलिसांनी रस्त्यावरच चार गोळ्या झाडल्या होत्या. का? तर तो आणि त्याची पत्नी मारिया अरेफी रस्त्यातून जात होते. मात्र, मारियाच्या ‘हेडस्कार्फ’मधून केस दिसत होते. यावर पोलिसांनी रेजा मोरादखानी समोरच मारियाला बेदम मारहाण सुरू केली होती. त्याने पत्नीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी त्याला गोळ्या मारून ठार केले.

असो. ही हिजाब चळवळ प्रखर होण्यामध्ये अलीनेजाद या महिलेचा मोठा वाटा आहे. या महिला पत्रकारने केस मोकळे सोडून व्हिडिओ काढले आणि ते समाजमाध्यमांवर टाकले. तिच्या फोटोंना इराणी महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातूनच हिजाबविरोधी जनमत तयार होत गेले. अर्थातच, अलीनेजादला तुरुंगवास झालाच. अलीनेजाद म्हणाली होती की, "आपल्या केसांना एकदा तरी हवेचा स्पर्श व्हावा, ते वार्यावर भुरभुरावेत, मुक्ततेचा अनुभव व्हावा, ही इराणी महिलांची इच्छा आहे.” अलीनेजादच्या म्हणण्याचा विचार केला, तर दुःख होते. कारण, इराणमध्ये १९७९ सालापूर्वी महिलांना व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. इस्लामिक क्रांती झाली. ‘शरिया’चे राज्य आले आणि महिलांसाठी नरकवास सुरू झाला. इतका की, लिपस्टिक लावलेल्या महिला दिसल्या की, रेझरने, ब्लेडने त्यांच्या ओठावरची लिपस्टिक खरवडून काढण्यात येई. भयंकर म्हणजे, मुलींच्या विवाहाचे वय १५ वरून नऊ केले गेले. या सगळ्या मुली-महिलांच्या आयुष्याचे नरक झाले. आज अनेकांचे म्हणणे आहे की, इराणमध्ये सध्या जे युद्ध सुरू आहे, ते म्हणजे या समस्त महिलांचा शाप आहे. त्यातही १६ वर्षांच्या आतेफा साहलेह या मुलीचा शाप इराणला लागला आहे.

आतेफा साहलेहचे वडील अमली पदार्थांचे व्यसनी होते. ती लहान असतानाच तिची आई अपघातामध्ये वारली. गरिबीमुळे अनाथ आतेफा मोलमजुरी करू लागली. वयाच्या १३व्या वर्षी तिला पोलिसांनी पकडले. कारण, ती एका मुलासोबत रस्त्यावर बोलत होती. तिला १०० कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली. तिला तुरुंगात डांबण्यात आले. जेव्हा ती तुरुंगातून सुटली, तेव्हा तिला चालताही येत नव्हते. भीतीने थरथर कापत, रडत ती तुरुंगाच्या बाहेर आली. पोलिसांनी तिच्यावर सामुदायिक बलात्कार केला, असे ती सांगत होती. १३ वर्षांच्या अनाथ मुलीसोबत हे घडले होते. पुढे पुन्हा तिला अशाच प्रकारे पोलिसांनी पकडले. यावेळी तिने न्यायालयात सांगितले की, मागच्या गुन्ह्यात अटक झाल्यापासून आतापर्यंत तुरुंगातील ५१ वर्षांच्या पोलीस अधिकार्याने तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. ती अनाथ पोर न्याय मागत होती. पण, इराण न्यायालयाने तिलाच चारित्र्यहीन ठरवले. ती अल्पवयीन होती, म्हणून तिला फाशीची शिक्षा देता येत नव्हती. त्यामुळे इराण प्रशासनाने तिच्या जन्मदाखल्यात बदल केला. तिचे वय १६ वरून २२ केले. ‘चारित्र्यहीन’ म्हणून या अश्राप, निराधार मुलीला फासावर चढवले गेले. ‘माझी चूक काय?’ हे ती विचारत होती. तिचे सुकलेले अश्रू, चिरडली गेलेली स्वप्न आणि तिचा अन्यायी, अवेळी मृत्यू या सगळ्यांचा शाप इराणच्या सत्ताधार्यांना लागणारच होता!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.