पीएमजीपी इमारतींना पुनर्विकासाची आस

म्हाडाकडून पुनर्विकासासाठी निविदा जारी ९४८ कुटुंबियांना मिळणार अत्याधुनिक घर

Total Views |


मुंबई : सन १९९० ते ९२ दरम्यान पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जोगेश्वरीतील १७ वसाहतींसाठी अखेर सोन्याचा दिवस उजाडला आहे. जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगर पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार असून तळमजला अधिक ४ मजले असलेल्या एकूण १७ इमारतीच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)ने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे या पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ९८४ कुटुंबीयांना अत्याधुनिक घरे मिळणार आहे. या नागरिकांना १८० चौरस फुट घरांच्या बदल्यात आता ४५० चौरस फुटांचे सोयीसुविधांयुक्त घर मिळणार आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनमनगर, मेघवाडी या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील (पीएमजीपी) वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी ईपीसी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. सुमारे २७ हजार ६२५ चौ. मी. क्षेत्रफळावर वसलेल्या पूनमनगर पीएमजीपी वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा म्हाडाचा संकल्प असून म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख दि.७ जुलै २०२५पर्यंत आहे. १९९०-९२ दरम्यान पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या या वसाहतीत तळमजला अधिक ४ मजले असलेल्या एकूण १७ इमारती आहेत. या वसाहतीमध्ये ९४२ निवासी व ४२ अनिवासी अशी एकूण ९८४ कुटुंबे वास्तवास आहेत.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.