मुंबई : मराठी प्रेक्षकांची आवड दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत चालली आहे, आणि त्यांना काहीतरी वेगळं, विचार करायला लावणारं पाहायला मिळालं की, ते डोक्यावर घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय ‘जारण’ या सिनेमाने. पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, सामाजिक भावनांचा आणि भयपटाच्या शैलीचा अनोखा मेळ साधणाऱ्या या सिनेमाने केवळ समीक्षकांचीच नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत.
अनिता दाते आणि अमृता सुभाष यांच्या जबरदस्त अभिनयाने सजलेला हा सिनेमा, कथानक आणि मांडणीच्या दृष्टीने मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक नवाच अनुभव ठरतोय. त्यांच्या सशक्त भूमिका आणि हृदयस्पर्शी भावनिक प्रवासाने प्रेक्षक थक्क झालेत. त्यामुळेच ‘जारण’ने अवघ्या १२ दिवसांत ३.५ कोटींची दमदार कमाई करत आपलं यश सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्याच्या शेवटीच सिनेमा १.६५ कोटींचा गल्ला जमवतोय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांनी या विषयाला जी संवेदनशीलता आणि सर्जनशीलतेची किनार दिली आहे, त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळतेय. "प्रत्येक प्रतिसाद आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देतो," असं ते अभिमानाने सांगतात.
निर्माते अमोल भगत यांच्या मते, "हे यश केवळ संख्येचं नसून, भावनांचं आहे. थिएटर शो वाढत आहेत, सोशल मीडियावर कौतुकाचं पाऊस सुरू आहे, आणि बॉक्स ऑफिसवर आकड्यांची चढती कमान आमच्या मेहनतीचं फळ आहे." कथानकात अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिकांबरोबरच किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, सीमा देशमुख यांचे अभिनयही लक्ष वेधून घेत आहेत. विशेषतः भय आणि भावनांचा सहज संगम साधत ‘जारण’ प्रेक्षकाला मानसिक आणि भावनिक पातळीवर जोडून घेतो.
मे महिन्यात 'आता थांबायचं नाय' आणि 'गुलकंद'सारखे सिनेमे यशस्वी ठरले असताना, 'जारण'ने या यादीत आपलं नाव ठळकपणे कोरलं आहे. प्रेक्षकांचा प्रेमळ प्रतिसाद, समीक्षकांचं कौतुक, आणि बॉक्स ऑफिसवरचं बळ या त्रिकुटामुळे 'जारण' २०२५ मधील एक महत्त्वाचा मराठी सिनेमा म्हणून नोंदवला जातोय.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.