मुंबई : दक्षिणातला सुपरस्टार आणि पॅन इंडिया अभिनेता प्रभास पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपट 'द राजा साब' चा दमदार टीझर नुकताच भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर याने धुमाकूळ घातला आहे.
टीझर लॉन्चसाठी आयोजकांनी हैदराबादमधील जवळपास दोन डझन मल्टिप्लेक्समध्ये विशेष शो आयोजित केले होते. प्रभासचे चाहते या क्षणासाठी आतुरतेने वाट पाहत होते आणि टीझर प्रदर्शित होताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. काही चाहत्यांनी तर प्रभासच्या कटआउटवर दूध अर्पण करत, ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून सेलिब्रेशन केले. प्रभासची लोकप्रियता आणि चाहत्यांचा प्रेमळ गोंधळ यामुळे हा टीझर इव्हेंट जणू सणासारखा भासला.
टीझरमध्ये प्रभासच्या स्वॅगने आणि त्याच्या अनोख्या हॉरर-कॉमेडी अंदाजाने चाहत्यांची मनं जिंकली. त्याचे संवाद, अॅक्शन आणि विनोदी टायमिंग पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. #TheRajaSaabTeaser हा हॅशटॅग काही वेळातच ट्विटर, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागला. दिग्दर्शक मारुती यांच्या दिग्दर्शनशैलीचेही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
'द राजा साब' या चित्रपटाला ''रौद्र, रोमांचक आणि रोमँटिक हॉरर एंटरटेनर'' असे वर्णन देण्यात आले आहे. प्रभाससोबत अभिनेत्री मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि ऋद्धि कुमार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. People’s Media Factory यांच्या निर्मितीत तयार होणाऱ्या या भव्य चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे, तर छायाचित्रणाची धुरा कार्तिक पलानी यांनी सांभाळली आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ग्रँड वर्ल्डवाइड रिलीज ५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. तेलुगूसोबतच हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
प्रभासच्या चाहत्यांसाठी ‘द राजा साब’ हा एक मेजवानी ठरणार यात शंका नाही. त्याचा नवा अवतार, हटके संकल्पना आणि जबरदस्त स्केल यामुळे हा सिनेमा चर्चेचा आणि वर्षाअखेरीसचा मोठा ब्लॉकबस्टर ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.